पारनेर पाणीप्रश्न… मंत्री राधाकृष्ण विखे यांचा भूमिपुत्र संघटनेच्या वतीने सत्कार

पारनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील कान्हूर पठार, पुणेवाडी, राळेगणसिद्धी आणि जातेगाव या उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाला अखेर जलसंपदा विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. या यशामुळे राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. सर्वेक्षणाला मंजुरी मिळाल्यामुळे पारनेर तालुक्यातील दुष्काळी भागातील पाणीप्रश्न सुटण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.

भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले असून, या योजनेच्या सर्वेक्षणासाठी ८ लाख ३५ हजार रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.या यशाबद्दल खऱ्या अर्थाने राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांचे भूमिपुत्र शेतकरी संघटनेतर्फे स्वागत आणि अभिनंदन करण्यात आले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर म्हणाले की, थोर समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा लढला गेला. “पारनेरच्या दुष्काळी भागाला पाणी मिळावे, ही आमची मुख्य भूमिका आहे. मंत्री विखे पाटील यांनी आमच्या मागणीचा विचार करून हा प्रश्न लवकर मार्गी लावावा,” अशी मागणी त्यांनी केली.या योजनेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांनी या लढ्याला मोठा पाठिंबा दिला असून, सर्वेक्षणानंतर ही योजना लवकर पूर्ण होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

यावेळी संघटनेचे संपर्कप्रमुख अशोक आंधळे, बाळशिराम पायमोडे, संतोष वाबळे, प्रवीण खोडदे, मनोज तामखडे, बाळासाहेब वाळुंज, अन्सार पटेल, अनिल सोबले, रघुनाथ मांडगे, सुभाष करंजुले, संजय भोर, अरुण बेलकर, मंजाबापू वाडेकर, अविनाश देशमुख, वसंत साठे, गोरख पठारे, नंदु साळवे, राहुल गुंड, शरद बालवे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. या यशामुळे पारनेर तालुक्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी नवीन आशा निर्माण झाल्या आहेत.

Leave a Comment