राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit pawar) यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत संभाव्य फूट पडणार असल्याच्या चर्चेने भाजप तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात अस्वस्थता पसरली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे डोळे लावून मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना अजित पवार खरेच भाजपमध्ये आले तर आपले काय? याची चिंता सतावू लागली आहे. अजित पवारांनी भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला तर सत्तेचे समीकरण बिघडणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थिर पूर्ण असताना अजित पवारांना सोबत घेण्याची घाई करू नये, असे भाजप आणि शिंदे गटातील आमदारांचे म्हणणे आहे.
गेल्या आठवड्यात अजित पवार हे नॉट रिचेबल होते. तेव्हापासून ते भाजपसोबत जाणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौर्यानंतर आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षात फूट पडू शकते यांची कल्पना उद्धव ठाकरे यांना दिल्यानंतर अजित पवार यांच्या बंडाबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे.
खुद्द अजित पवार यांनी आपण अमित शहा यांची भेट घेतली नसल्याचे स्पष्ट केले असले तरी काल, रविवारी नागपूरच्या आघाडीच्या सभेत त्यांनी भाषण न केल्याने त्यांच्याबद्दलचा संशय कायम आहे. अशातच भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांकडून अजित पवार आमच्या सोबत आले तर त्यांचे स्वागत आहे, असे विधान करून अजितदादांविषयी संभ्रम आणखी वाढवला आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून राज्यात सत्ता परिवर्तन केले. सत्ता बदलानंतर जवळपास 40-42 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. 9 ऑगस्ट 2022 रोजी मंत्रिमंडळ विस्तार होऊन 18 जणांना कॅबिनेट मंत्री बनविण्यात आले.
तेव्हापासून भाजप आणि शिंदे गटातील इच्छुकांचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. पण आता विस्तार बाजूला राहिला आणि अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपही हवालदिल झाला आहे.
अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी केली तर त्यांना आणि त्यांच्यासोबत येणार्या आमदारांना सत्तेत वाटा द्यावा लागले. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांना नाईलाजाने सत्तात्याग करावा लागू शकतो.
विधानसभा निवडणुकीला जेमतेम 15 ते 16 महिने शिल्लक असताना अजित पवारांसाठी सत्तेवर पाणी सोडण्याची बहुतांश आमदारांची तयारी नाही. या पार्श्वभूमीवर भाजपला स्वकीयांची नाराजी पत्करून अजित पवारांना सत्तेत बसवावे लागेल.
शरद पवार यांनी कुणी काहीही निर्णय घेतला तरी आपण महाविकास आघाडीसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अजित पवार दोन तृतीयांश आमदार सोबत घेऊन बाहेर पडण्यात यशस्वी होतील किंवा कसे याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
