नगर ब्रेकिंग! “या” पायी दिंडीतील रथाला अपघात, ५ वारकरी जखमी

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथून पंढरपूरकडे जाणार्‍या श्री दत्त सेवा पायी दिंडीच्या रथाला काल दि. 3 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास पंढरपूर जवळील भोसे गावानजीक एका पिकअप गाडीने जोराची धडक दिली. या घटनेत पाच वारकरी जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील श्री दत्त सेवा पायी दिंडी सोहळा पंढरपूरकडे जात असताना बुधवारी रात्री पंढरपूर जवळील भोसे गावात दिंडीचा मुक्काम होता. काल दि. 3 जुलै रोजी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास दिंडी पंढरपूरकडे निघाली. तेव्हा करकंब ते पंढरपूर जाणार्‍या रोडवर भरधाव वेगात आलेल्या एका पिकअप गाडीने दिंडीतील रथाला जोराची धडक दिली.

यावेळी रथ उलटून दिलीप आडगळे, सुभाष चौधरी, सुरेश पाचारणे, भाऊसाहेब शेजूळ, देवराम निकम, सर्व रा. टाकळीमिया, ता. राहुरी, हे पाच वारकरी जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी सुभाष चौधरी यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

Leave a Comment