मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ठाकरे बंधू एकत्र आले तरीही…..

शिर्डी : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले तरीही त्याचा कोणताही परिणाम महायुती सरकारवर होणार नाही, असं स्पष्ट मत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणी इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलं. मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वरळीत विजयी मेळावा घेतला. या कार्यक्रमानंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

जवळपास 20 वर्षांनंतर आज (5 जुलै) उद्धव आणि राज ठाकरे एकाच राजकीय मंचावर एकत्र आले. ‘मराठी’च्या मुद्यावरून एकत्र आलेल्या शिवसेना (उबाठा) आणि मनसेचा संयुक्त असा ‘विजयी मेळावा’ आज वरळी डोममध्ये पार पडला. हजारो कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राज आणि उद्धव यांनी महाराष्ट्रातील मराठी जनतेला एकजूट राहण्याचा संदेश दिला.

विजयी मेळाव्या’नंतर आता भाजपाकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. ज्येष्ठ नेते जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ‘ठाकरे बंधू एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. या मेळाव्यात ठाकरे बंधुंनी ठाकरी शैलीत सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला. तसंच, मराठीच्या मुद्द्यावर तडजोड केली जाणार नसल्याचा इशारा दिला.

राज आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर मंत्री विखे पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर विखे पाटील यांनी सांगितलं, “कोणतेही राज्य एका ठोस विचारधारेवर चालत असते. आज आमच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रगल्भ आणि निर्णायक नेतृत्व आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा उत्कृष्ट प्रशासक लाभला आहे. महायुती सरकार विकासाचा अजेंडा घेऊन काम करत आहे. ही सत्ता केवळ सत्तेसाठी नाही. तर जनतेच्या मनातील सरकार आहे. त्यामुळे कोणी एकत्र आलं तरी आमच्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही”.

Leave a Comment