बिग ब्रेकिंग! माणिकराव कोकाटेंचे कृषिमंत्रीपद जाणार! ‘या’ नेत्यांचे नाव चर्चेत

मुंबई – राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे विधानसभेत रमी खेळतानाचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने अडचणीत सापडले आहेत. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषिखाते काढून घेण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोकाटे यांच्या मंत्रीपदावर टांगती तलवार असल्याचे बघायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याजागी अमळनेरचे माजी मंत्री आणि आमदार अनिल भाईदास पाटील यांना कृषिखाते देण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे मंत्रिमंडळात पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. महायुतीच्या पहिल्या कार्यकाळात ते राज्याचे आपत्ती आणि पुनर्वसन मंत्री होते. मात्र, नव्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होऊ शकलेला नव्हता.

त्यानतंर आता कोकाटे यांच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाची आणि सरकारची प्रतिमाही डागाळली जात असल्याने त्यांच्याजागी अनिल भाईदास पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाटील यांच्याकडे कृषिखाते देऊन परिणामी उत्तर महाराष्ट्राला प्रतिनिधित्व देताना प्रादेशिक संतुलन राखण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न असणार आहे.

मकरंद पाटलांकडे जाऊ शकतं कृषिमंत्रिपद

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्याकडे राज्याच्या कृषिमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. मकरंद पाटील हे साताऱ्यातील असून, अजित पवारांचे विश्वासू मानले जातात. तसेच पाटील यांच्या खात्याची जबाबदारी माणिकराव कोकाटे यांच्याकडे दिली जाऊ शकते. नाहीतर कोकाटे यांना मंत्रिमंडळातून डावलून त्यांच्याजागी अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते.

अजित पवार आणि सुनील तटकरे यांची महत्त्वाची बैठक होणार

अजित पवार बुधवारी (आज) मुंबईला येणार होते. परंतु त्यांचा आजचा दौरा रद्द झाला आहे. तसेच खासदार सुनील तटकरे हे संसदेच्या पावसाळी अधिवेशाच्या निमित्ताने नवी दिल्लीत आहे. त्यामुळे पुढच्या दोन ते तीन दिवसांत दोघांचीही एकत्र बैठक होऊन माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे.

Leave a Comment