मुंबई – उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली असताना महाराष्ट्राच्या राजकारणात चमत्कारिक घडामोडी घडत आहेत. राज ठाकरेंनी थेट महाविकास आघाडीच्या खासदाराला पत्र पाठवले आहे.
राज ठाकरेंनी कॉंग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचं कौतुक केलं आहे. निशीकांत दुबेंना संसदेत घेराव घालत जाब विचारल्याबद्दल राज ठाकरे यांवी वर्षा गायकवाड यांचे अभिनंदन केलं आहे.
राज्यातील हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या वादात विनाकारण उडी घेऊन ‘महऱ्हाटी माणसा’ला डिवचणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेंना मराठी खासदारांनी घेरलं. संसद भवनात त्यांना अचानक गाठून घेराव घालत वादग्रस्त विधानांचा जाब विरोधी पक्षांच्या महिला खासदारांनी विचारला. ‘जय महाराष्ट्र’ च्या घोषणांनी संसद भवनाची लॉबी दणाणून गेली अन् दुबे यांना तेथून चक्क काढता पाय घ्यावा लागला होता.
विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव, प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या खासदारांनी दुबेंना जाब विचारला. “मराठी लोकांना मारण्याची भाषा कशी करू शकता ? तुम्ही आपटून आपटून कुणाला आणि कसे मारणार? कसली ही तुमची अर्वाच्च भाषा ? तुमचे वागणे-बोलणे योग्य नाही… मराठी भाषकांविरोधातील तुमची ही अरेरावी आम्ही खपवून घेणार नाही” अशा शब्दांत गायकवाड यांनी दुबेंना सुनावले.
राज ठाकरे यांनी वर्षा गायकवाड यांना पाठवलेले पत्र जसेच्या तसे
खासदार वर्षाताई गायकवाड,
सस्नेह जय महाराष्ट्र!
मराठी माणसांना आपटून आपटून मारू, अशी डोक्ती करणाऱ्या निशिकांत दुबेला तुम्ही संसदेत घेराव घातलात आणि त्याला जाब विचारलात याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, मराठी भाषेचा अपमान, त्यावर हल्ली सर्रास अन्याय होत असताना, संसदेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे बासदार गप्प असतात असं चित्र मराठी जनांच्या समोर येत होतं, त्याला तुम्ही या कृतीने छेद दिलात. याबद्दल बरंच मनापासून आभार.
महाराष्ट्राला सध्या ‘व्यापक भूमिका घेण्याच्या विचारांनी ग्रासलेलं आहे. माझ्या मते हा उगाच ओढवून घेतलेला न्यूनगंड आहे. महाराष्ट्राने देशाचा विचार केला पाहिजे हे खरं आहे कारण देशाचा विचार करावा आणि देशासाठी काही करावं अशी क्षमता असलेली जी काही मोजकी राज्य आहेत त्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. पण म्हणून आपण मराठी आहोत, मराठी जनतेने आपल्याला निवडून दिलं आहे, त्यामुळे या जनतेप्रती, या प्रांताबद्दल आपली जबाबदारी पहिली आहे याचा विसर पडायला लागला आहे. यामुळेच सव्वाशे वर्ष हिंद प्रांतावर राज्य करणाऱ्या, आणि 1857 चा उठाव असू दे की पुढचा स्वातंत्र्यलढ्याला आकार देणाऱ्यात मरहट्टे होते याचा आपल्याला विसर पडतो आणि म्हणूनच या उत्तरेतील मुजोरांना दिल्लीत सातत्याने महाराष्ट्र आणि मराठी माणसाची ताकद दाखवलीच पाहिजे, आणि तुम्ही ती दाखवलीत याबद्दल मनापासून आभार.
महाराष्ट्रातील इतर ४५ खासदार गप्प का बसले माहित नाही, पण तुम्ही हिंमत दाखवलीत याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. महाराष्ट्रासाठी तुमचा संसदेतील आवाज असाच बुलंद राहील अशी आशा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे. महाराष्ट्र, मराठी भाषा आणि मराठी माणूस या समोर कोणतेही आपले वैचारिक मतभेद अत्यंत क्षुद्र आहेत !
तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
आपला नम्र,
राज ठाकरे
. शिवतीर्थ. केळुस्कर मार्ग शिवाजी पार्क, दादर (प)
