शाब्बास! विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी कुस्ती मैदान गाजवले, “या” विद्यार्थ्यांनी मिळवले यश 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथील विद्या प्रबोधिनी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संगमनेर येथे पार पडलेल्या तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांनी कुस्ती स्पर्धेत बाजी मारली आहे. त्यामुळे बुद्धीबळ स्पर्धेनंतर कुस्ती स्पर्धेत देखील विद्यार्थ्यांनी विद्या प्रबोधिनी प्रशालेचे नावलौकिक केले आहे.

तालुका स्तरीय स्पर्धेतील चौदा वर्षे वयोगटातील ३५ किलो वजनी गटात कार्तिक संतोष डुबे याने द्वितीय क्रमांक पटकावला तर ५५ किलो वजनी गटात आशिष रामदेव पासवान याने देखील द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर १७ वर्षे वयोगटातील ६५ किलो वजनी गटात साईनाथ भाऊसाहेब भालके याने प्रथम क्रमांक पटकावला असून त्याची थेट जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

तसेच १९ वर्षे वयोगटातील (ग्रीको रोमन) ५७ किलो वजनी गटात तन्मय सुशील करंजेकर याने प्रथम क्रमांक पटकावत थेट जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आगेकूच केली आहे. तसेच ५७ किलो वजनी गटात कुणाल संजय मोहिते याने तृतीय क्रमांक पटकावला आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर यश संपादन केले आहे. तसेच आपल्या खेळातून प्रेक्षकांचे मन जिंकले. विद्या प्रबोधिनी विद्यालयाने खेळ आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात सातत्याने उत्कृष्टता दाखवली असून, यंदाच्या या यशाने पुन्हा एकदा आपला ठसा उमटवला आहे

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष इंद्रजीत पा. खेमनर, उपाध्यक्ष शंकरराव पाटील खेमनर, सेक्रेटरी भाऊसाहेब सागर, सर्व संचालक मंडळ, रजिस्ट्रार हेमचंद्र होळकर, प्राचार्या गुलशन जमादार, मुख्याध्यापक सुभाष घुगरकर, इन्चार्ज कोळेकर सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

Leave a Comment