संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथे ईद-उल-फित्र ( रमजान ईद) उत्साही, आनंदी आणि मंगलमय वातावरणात उत्साहात साजरी करण्यात आली. महिनाभर रोजे करून सश्रध्द भावनेने अल्लाहची इबादत केल्यानंतर शनिवारी (दि. २२) सकाळी ९ वाजता साकूर येथील ईदगाहावर मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामूहिक नमाज अदा केले.
तसेच यावेळी मुफ्ती मोहम्मद इस्लाम यांनी ईद उल फित्रची नमाज करून विश्वशांतीसाठी प्रार्थना केली. नमाज पठणासाठी परिसरातील आबालवृद्ध आणि समाजबांधवांनी मैदान गर्दीने फुलून गेला होता. अल्लाहविषयी कृतज्ञता व्यक्त करत बहुजन समाजबांधवांनी एकमेकांना गळाभेट देऊन शुभेच्छा दिल्या.
गेले महिनाभर रमजानचे रोजे करून मुस्लिम कुटुंबीयांनी अल्लाह व त्यांचे प्रेषित मोहम्मद पैगंबरांविषयी श्रध्दा प्रकट केली. काल शुक्रवारी सायंकाळी चंद्रदर्शन होताच ईद का चाँद मुबारक म्हणून एकमेकांना शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच शनिवारी ईदच्या दिवशी सकाळी साकुर येथील ईदगाहावर मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून व अत्तर लावून प्रसन्न चित्ताने नमाजासाठी एकत्र आले होते.
यावेळी सामूहिक नमाज व प्रार्थना करण्यात आली. देशात व जगात सुख व शांती नांदू दे, बेरोजगारांना रोजगार मिळू दे, आजारी व संकटात सापडलेल्यांची पीडा टळू दे, सर्वाना खऱ्या अर्थाने धर्माने सांगितलेल्या मार्गावरून चालण्याची सद्बुध्दी मिळू दे अशी प्रार्थना करण्यात आली.
तसेच घरोघरी शिरखुम्याचा आस्वाद घेत सर्वांनी ईदचा आनंद लुटण्यास सुरूवात केली आहे. यावेळी घारगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी उपस्थित राहून ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सफौ खेडकर, पो.हे.कॉ. वायाळ, पोहेकॉ गणेश लोंढे, पो.ना.संतोष खैरे, पो.ना. किशोर लाड, पो.कॉ. बिरे, पो. कॉ. बांडे, पो. कॉ. चव्हाण तसेच साकुर परिसरातील शेकडो मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रमजान ईद व अक्षय तृतीयेच्या सर्व हिंदू बांधवांना शुभेच्छा देतो. सर्वांनी शांततेत सण उत्साहात साजरा करावा. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची समाजबांधवांनी काळजी घ्यावी.
संतोष खेडकर
पोलिस निरीक्षक
घारगाव पोलिस स्टेशन
