संगमनेर(DSNews24 / किरण पुरी) गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच बिगुल वाजणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीचा धूरळा उडणार आहे. नुकतेच संगमनेर तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गट आणि १८ पंचायत समिती गणांची अंतिम प्रभागरचना जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली होती. त्यानंतर आरक्षण काय लागणार याकडेच सर्वाचे लक्ष लागले होते.
दरम्यान आज राज्यातील ३४ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांच आरक्षण जाहीर झालं आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अनुसूचित जमाती (महिला) हे आरक्षण लागलं असून जिल्हा परिषदेचा आगामी अध्यक्ष महिला असणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद गट व गणात काय आरक्षण लागेल याचीच उत्सुकता आता सर्वांनाच लागली आहे.
दरम्यान संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा आणि सर्वांचेच लक्ष लागून असलेल्या साकूर जिल्हा परिषद गटात काय आरक्षण लागेल अशी जोरदार चर्चा सुरू आहे. मागील निवडणुकीवेळी या गटात महिला आरक्षण होते. त्यामुळे आता पुन्हा नवीन आरक्षण काय लागेल अशी खमंग चर्चा सुरू झाली आहे. तसेच इच्छुकांनी काही महिन्यांपासूनच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.
मात्र यंदा आरक्षण नव्याने निश्चित केले जाणार असल्याने सर्वांचे लक्ष या सोडतीकडे लागले आहे. यंदा जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीत ग्रामविकास विभागाने यापूर्वीचे आरक्षण रद्द ठरवत आमूलाग्र बदल केला आहे. नव्याने होणाऱ्या आरक्षण सोडतीत गट व गणातील लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने आरक्षण निघेल. त्यामुळे इच्छुकांनी आपल्या पातळीवर आरक्षणाचा अंदाज बांधला आहे. मात्र, अधिकृत आरक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र आपला गट आरक्षित होऊ नये यासाठी इछुकांनी देव पाण्यात ठेवले आहे.
मात्र सुत्रांच्या माहितीनुसार साकूर जिल्हा परिषद गटात “ओबीसी किंवा खुला” हे आरक्षण लागण्याची शक्यता आहे. तसे गणिते देखील जुळविली जात आहे. मात्र नेमकं आरक्षण सोडत काय जाहिर होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
मात्र साकूर गटाशेजारील एक जिल्हा परिषद गट आरक्षित होण्याची शक्यता असून त्या गटातील एक मातब्बर युवा नेता साकूर जिल्हा परिषद गटात निवडणूक लढवावी अशी पठारभागात चर्चा सुरू आहे. सदर नेत्याचा तालुक्यासह जिल्ह्यात मोठा जनसंपर्क असून त्या नेत्याने साकूर गटातून निवडणूक लढवावी अशी चर्चा संपुर्ण पठार भागातून होताना दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात साकूर जिल्हा परिषद गटात खळबळजनक घडामोडी घडणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे.
साकुर जिल्हा परिषद गट
पिंपळगाव देपा गणातील गावे –
वरवंडी, मांडवे बुद्रुक, खांबे, डोळासणे, शिंदोडी, कर्जुले पठार, खरशिंदे, रणखांबवाडी, कौठे मलकापूर, दरेवाडी,
साकूर गणातील गावे
साकुर, जांभूळवाडी, नांदूर खंदरमाळ, जांबुत बुद्रुक, हिवरगाव पठार, बिरेवाडी, शेंडेवाडी
