पुणे : राज्यात सध्या विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापले आहे. त्यातही जातीपातीच्या मुद्द्यावरून होणाऱ्या राजकारणाची सर्वाधिक चर्चा रंगलेली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी (10 ऑक्टोबर) सोलापुरातील करमाळा येथे हिंद जन आक्रोश मोर्चाला हजेरी लावली होती. या मोर्चामध्ये सहभागी झाल्यानंतर संग्राम जगताप यांनी उपस्थित लोकांना संबोधित करताना दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकांनी फक्त हिंदू लोकांच्याच दुकानातून खरेदी करावी, असे आवाहन केले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, आता अजित पवार यांनी स्वत: संग्राम जगताप यांच्या वक्तव्याची दखल घेतली असून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार असल्याची माहिती दिली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांना संग्राम जगताप यांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, संग्राम जगताप यांनी अतिशय चुकीचं विधान केलं आहे. आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत. एकदा पक्षाची ध्येय आणि धोरणं ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून कुठलाही खासदार, आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशाप्रकारची वक्तव्य करत असतील, तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही. ही भूमिका आमची कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील. शिव-शाहु-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही पुढे जात आहोत, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
अजित पवार म्हणाले की, अरुणकाका जगताप जोपर्यंत हयात होते, तोपर्यंत सर्व तिथे सुरळीत होतं. पण आता काही लोकांना आपल्यावर जबाबदारी वाढलेली आहे. आपल्या वडिलाचं आपल्यावर छत्र राहिलेलं नाही. त्यावेळेस जबाबदारीने आपण वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, हे समजून घेण्याची गरज आहे. हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र असून सर्वांना आम्ही बरोबर घेऊन पुढे जाणार आहोत. मध्यतंरी मी संग्राम जगताप यांच्या इथे एका कार्यक्रमाला गेलो होतो, तेव्हा त्यांना मी त्यांच्या भूमिकेबद्दल सांगितलं होतं. तेव्हा त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की, मी सुधारणा करेल. पण ते सुधारणा करताना दिसत नाहीत. त्यामुळे त्यांची जी भूमिका आहे, त्यांचे जे विचार आहेत, ते पक्षाला अजिबात मान्य नाही. त्यामुळे संग्राम जगताप यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
