मुंबई – मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी हवामान पूर्णपणे कोरडं असल्याचं पाहायला मिळालं. नैऋत्य मान्सूनने राज्यातून निरोप घेतल्याचं चित्र निर्माण झालं होतं.मात्र,15 ऑक्टोबरपासून राज्यातील हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 18 ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे.
पाऊस पुन्हा एकदा विदर्भ आणि मराठवाड्याला झोडपून काढू शकतो. येथील अनेक भागात ढगाळ हवामान किंवा वादळी पावसाची शक्यता राहील. तर खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाच्या जोरदार सरी बरसू शकतात.
मुंबई, पुणे, मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात पाऊस माघार घेईल,असा अंदाज होता. मुंबईतून पावसाने निरोप घेतल्याचं हवामान विभागाने जाहीर केलं होतं. दसऱ्यापर्यंत म्हणजेच 2 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्राच्या अनेक भागात पावासाच्या सरी कोसळल्या होत्या.
5 किंवा 6 ऑक्टोबरपासून पाऊस परतीच्या प्रवासाला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे 3 तारखेला महाराष्ट्रात शक्ती चक्री वादळ घोंगावणार असल्याची माहिती समोर आली होती. आपत्ती व्यवस्थापन विभागाने या वादळाच्या संभाव्य परिणामांबाबत जिल्हा स्तरावर अतिदक्षतेचा इशाराही दिला होता.
