संगमनेर(DSNews24) विवाहित असूनही एकमेकांवर प्रेम असल्याने तीन वर्षापासून प्रियकर आणि प्रेयसी हे सोबत राहत होते. मात्र, प्रियकराने नंतर सोबत राहण्यास नकार दिल्याने प्रेयसीने त्याचा खून केला. ही घटना संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथे रविवारी (दि. १२) समोर आली. मात्र घारगाव पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतल्यानंतर मंगळवारी या घटनेचा उलगडा झाला.
भाऊसाहेब विठ्ठल बाचकर (रा. जांभूळबन, ता. राहुरी) असे खून झालेल्या प्रियकराचे तर जयश्री काकासाहेब चव्हाण (रा. काटे पिंपळगाव ता. गंगापूर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या प्रेयसीचे नाव आहे.
रविवारी दि. १२ ऑक्टोबरला मांडवे बु, शिवारात साधारण ३० ते ३५ वर्ष वयाचा पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. मयताची ओळख पटविताना हा मृतदेह भाऊसाहेब बाचकर याचा असल्याचे पोलिसांना समजले. अधिक तपासात भाऊसाहेब बाचकर व जयश्री चव्हाण यांच्यात मागील तीन वर्षापासून प्रेमसंबंध होते. ते दोघे अहिल्यानगर येथे एकत्र राहत होते. शनिवारी (दि.११) दुपारी बाचकर हा पत्नी व मुलांना भेटण्यासाठी साकुर (ता. संगमनेर) येथे आला होता. तेव्हा त्याच्यासोबत जयश्री चव्हाण ही देखील होती. ‘मला आता जयश्री सोबत राहायचे नाही, यापुढे तुझ्यासोबत राहणार आहे’ असे पत्नी योगिता बाचकर हिला सांगितले.
दोघे मोटारसायकलवर गेले
वादावादीनंतर भाऊसाहेब बाचकर याला जयश्री चव्हाण मोटारसायकलवर घेऊन गेली. त्यानंतर त्याचा मृतदेह मांडवे येथे आढळून आला. पोलिसांनी जयश्री चव्हाण हिचा शोध सुरू केला. दरम्यान, तिने तिचा पती काकासाहेब चव्हाण यास फोन करून नेवासा फाटा येथे बोलावले असल्याची माहितीही समोर आली. पोलिसांनी तिला प्रवरासंगम, नेवासा येथून ताब्यात घेतले. भाऊसाहेब बाचकर याने माझेसोबत न राहण्याच्या कारणावरून त्याच्या डोक्यात टणक हत्यार मारून त्याचा खून केला, अशी कबुली तिने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदरची कारवाई अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे यांचे मार्गदर्शानाखाली सहायक सहा.पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस उप निरीक्षक अजय कौटे, पो.उप.निरी. आदिनाथ गांधले, पोहेकॉ दत्तु चौधरी, पोकॉ सुभाष बोडखे, पोकॉ प्रमोद गाडेकर, पोकॉ महादेव हांडे, मपोकॉ अमृता नेहरकर घारगांव पोलीस स्टेशन व पोना सचिन धनाड अपर पोलीस अधीक्षक, कार्यालय, श्रीरामपुर यांनी केली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास घारगांव पोलीस स्टेशन हे करीत आहे.
