…तर राधाकृष्ण विखे पाटलांना सोडणार नाही, “या” मंत्र्याचा थेट इशारा 

बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी अत्यंत आक्रमक भाषण केलं. मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीगाठी घेताना याआधी दिसले आहेत.

यावरुन छगन भुजबळ यांनी भाजपला मोठा इशारा दिला. राधाकृष्ण विखे पाटील यांनाही सोडणार नाही, असं छगन भुजबळ म्हणाले. भुजबळांनी यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यावरही टीका केली. तसेच भाजपने आपल्या नेत्यांना आवरावं, असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं. जरांगे म्हणतात, ओबीसींना पाडा, असे आदेश आम्हीही देऊ शकतो, असा देखील इशारा भुजबळ यांनी दिला.

“2 सप्टेंबरला एक जीआर निघाला. आम्ही कोर्टाला गेलो. आमचे मोठे वकील उभे आहेत. माझी खात्री आहे, आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण आम्ही दुहेरी लढणार आहोत. एक लढाई न्यायदेवतेकडे लढणार आहोत. दुसरी लढाई म्हणजे रस्ता तर आमच्याच बापाचा आहे हे लक्षात ठेवा. काय तुम्ही सांगता. मला सांगता तुम्ही येऊ नका. तो विखे कसा काय आला? विखे आला आणि संपूर्ण महाराष्ट्रात विखार पसरवून गेला”, असा घणाघात छगन भुजबळ यांनी केला.

“माझ्याकडे जातीचं प्रमाणपत्र आहे. 3 ऑक्टोबर 2025 ला सकाळी अर्ज केला. त्याच दिवशी संध्याकाळी जात प्रमाणपत्र मिळालं. अरे आठ-आठ, दहा-दहा महिने लागतात. तुमचे अधिकारी एवढे फास्ट कसे झाले? अनेक सर्टिफिकेट चेक झाले? मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगितलं. एवढे फास्ट अधिकारी या देशात कधीपासून जन्माला आले? आम्हाला 10 महिने लागतात, ह्यांना 10 तासांत. आपणच सांगितलं की, ओबीसी आमचा डीएनए आहे. हा डिएनए कधी सरकेल सांगता येणार नाही”, असा इशारा भुजबळांनी दिला.

“विखेंनी जरांगेंच्या हातात एक जीआर दिला. दरिंदे पाटलाने सांगितलं की, विखे हा पात्र शब्द काढून या. एक तासाच पात्र शब्द काढला. हा कुठला कायदा आहे? माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. मराठा आणि कुणबी वेगळ्या जाती आहेत. हायकोर्टाचे निकाल आहेत. अरे कसंकाय तुम्ही ओबीसीतून आरक्षण देता? सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की, मराठा समाज सामाजिकदृष्या मागास नाहीत. त्यावेळी सीएम नागपूरला होते. त्यांनी निर्णय घेऊन टाकला. पात्र शब्द काढून टाकला. मला मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे, ही मंडळी तुमच्या वाईटावर आलेली आहे. तुम्हाला अडचणी निर्माण करणार आहेत. त्यांचा टार्गेट देवेंद्र फडणवीस आहे हे लक्षात ठेवा”, असा दावा भुजबळांनी केला.

“आता निवडणुका येत आहेत. एका विरुद्ध एक लढा. विजय तुमचाच आहे. दलित, आदिवासी, मुस्लिम सर्वांना एकत्र घ्या. विजय तुमचाच आहे. तुम्ही अशा रितीने लोकांना मार्गदर्शन करत असाल तर आम्हाला सुद्धा करता येतं. विरोधी पक्षाच्या एका मोठ्या नेत्याने मला फोन केला की, आम्ही जरांगेंना भेटायला गेलो तर आमच्यावर टीका करता, पण तुमचे हे विखे पाटील कारण नसताना परत परत जातात त्यांना का बोलत नाहीत? आम्ही त्यांना सुद्धा सोडणार नाहीत. गप्प बसणार नाहीत. भाजपच्या नेत्यांनाही सांगतोय तुमच्या लोकांना आवरा. तुम्ही आता केलंय तर आम्ही कोर्टात लढू. निवडणुकीत लढू”, असादेखील इशारा त्यांनी दिला.

Leave a Comment