मुंबई – सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्सव सुरू आहे, दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. राजकीय वर्तुळात देखील दिवाळीनिमित्त नेत्यांच्या भेटीगाठी सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. एकमेकांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.
आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. प्रसाद लाड यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत, त्यानंतर आता या भेटीची जोरदार चर्चा सुरू झाल्याचं पहायला मिळत आहे.
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी आज शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या सिलव्हर ओकवर जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांची देखील उपस्थिती होती.
या भेटीदरम्यान प्रसाद लाड यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना लाड कुटुंबाच्यावतीने दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच ” मी आजोबा झालो, माझ्या मुलीला मुलगा झाला” ही आनंदाची बातमी देखील त्यांनी यावेळी पवार यांना सांगितली.
