नाशिक – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाने खातं उघडलं आहे. राज्यात शिवसेनेच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या खान जुबेदाबी यांची नांदगावमधून नगरसेवकपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या नांदगाव नगरिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ ‘ब’मधून शिवसेना शिंदे गटाच्या खान जुबेदाबी गफार खान यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीने नांदगाव नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाचा पहिला उमेदवार बिनविरोध ठरला. आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वात ही बिनविरोध निवड झाली आहे.
दरम्यान, नांदगाव नगरपरिषदेत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगराध्यक्ष राजेश कवडे आणि सागर हिरे यांनी अर्ज दाखल केला होता. पण छाननी प्रक्रियेमध्ये राजेश कवडे यांना मोठा धक्का बसला. नांदगावातून आमदार सुहास कांदे यांचे कट्टर समर्थक असलेल्या सागर हिरे यांना न्याय मिळाला. शिवसेना शिंदे गट- भाजप युतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची माळ सागर हिरे यांच्या गळ्यात पडली.
छाननी प्रक्रियेत शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज दाखल केलेले राजेश कवडे यांचा अर्ज निवडणूक आयोगाकडून अवैध ठरवण्यात आला. तर सागर हिरे यांचा अर्ज निवडणूक आयोगाकडून वैध ठरवण्यात आला. सागर हिरे यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर सुहास कांदे समर्थक कार्यकर्त्यांनी यावेळी एकच जल्लोष केला. नगरपरिषद कार्यालयासमोर फटाके फोडण्यात आले.
