हृदयद्रावक…. लग्नानंतर अर्ध्या तासात नवरदेवाचा मृत्यू, लग्नमंडपात शोककळा 

अमरावती – जिल्ह्यातील वरुड तालुक्यात दुर्दैवी आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. लग्नाच्या दिवशीच अमोल गोड या तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेनं आनंदी उत्सव सुरू असलेल्या लग्नमांडवात काही क्षणातच शोककळा पसरली.

वरुड तालुक्यातील पुसला गावाचे कोतवाल अमोल गोड यांचा हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अमरावतीच्या वरुड तालुक्यातील पुसला तलाठी कार्यालयामध्ये कोतवाल म्हणून ते कार्यरत होते. विशेष म्हणजे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण होता, दोनाचे चार हात होऊन त्यांचा संसार थाटला जाणार होता. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळच होतं. शुभ मुहूर्तानुसार मंगळवारी दुपारीच अमोल यांचा विवाह झाला.

शुभ मंगल सावधान म्हणत सर्वांनी अमोल यांच्या वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छाही दिल्या. मात्र, लग्न सोहळ्याच्या अर्ध्या तासानंतरच अमोल यांस हृदयविकाराचा झटका आल्याने ते खाली कोसळले. त्यानंतर, त्यांना तात्काळ रुग्णालयातही दाखल करण्यात आले. मात्र, ह्रदयविकाराच्या झटक्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनं सर्वत्र शोककळा पसरली मुलगा आणि मुलगी अशा दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Leave a Comment