राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेतच होतील, असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोगाकडून दोन दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा केली जाणार आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. काही दिवसांत जिल्हा परिषदा आणि पंचायतीच्या निवडणुकीची घोषणा होणार असल्याचे समजतेय.
राज्यात तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात नगरपरिषदेचं बिगुल वाजलेय. आता दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदेचा धुरळा उडणार आहे. सोमवारी आयोगाकडून राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. ज्या जिल्हा परिषदेमध्ये आरक्षणाची ५० टक्के मर्यादा ओलांडली, त्या ठिकाणी निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे.
राज्यात 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असणाऱ्या जिल्हा परिषद –
नंदुरबार 100%
पालघर 93%
गडचिरोली 78%
नाशिक 71%
धुळे 73%
अमरावती 66%
चंद्रपूर 63%
यवतमाळ 59%
अकोला 58%
नागपूर 57%
ठाणे 57%
गोंदिया 57%
वाशिम 56%,
नांदेड 56%
हिंगोली 54%
वर्धा 54%
जळगाव 54%
भंडारा 52%
लातूर 52%
बुलढाणा 52%
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर सध्या प्रशासक राज आहे. गेल्या ८ वर्षांपासून नगरपरिषदा, नगरपंचायती, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या नाहीत. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा धुरळा उडालाय. २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्याआधीच आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. आयोगाकडून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. सोमवारी आयोगकाडून निवडणुकीची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.
५७ ठिकाणी टांगती तलवार –
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका वेळेतच होतील, त्याला कोणताही स्थगिती नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणीवेळी स्पष्ट केले. २ डिसेंबर रोजी नगर परिषदेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे त्याला स्थगिती देणे आता योग्य नसल्याचे कोर्टाने म्हटलेय. पण ज्या ५७ ठिकाणी आरक्षणाचे उल्लंघन झालेय, त्या ठिकाणे अंतिम निर्णयासाठी बांधील असतील, असेही स्पष्ट केलेय. २१ जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे, त्यावेळी या ५७ ठिकाणाचा निकाल निश्चित होणार आहे.
