बाळासाहेब थोरातांनी एकनाथ शिंदेंची उडवली खिल्ली, नेमकं काय घडल?

संगमनेर नगरपालिका निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली असून, राजकीय नेत्यांच्या टोमण्यांनी वातावरण आणखी तापले आहे. भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संगमनेरमध्ये शुक्रवारी (28 नोव्हेंबर) सभा पार पडली होती.

सभेदरम्यान त्यांनी शहरातील काही महत्वाच्या प्रश्नांवर दोन मंत्र्यांना थेट फोन करून तातडीने कामे मंजूर करण्याचे आदेश दिल्याने ही सभा चांगलीच चर्चेत आली. या सभेनंतर शहरात शनिवारी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विधानपरिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर सेवा समितीची सभा झाली. शिंदेंच्या फोन-ऑर्डर शैलीवर दोन्ही नेत्यांनी जोरदार पलटवार केला. तर सुजय विखेंनी दिलेल्या “टायगर अभी जिंदा है” या घोषणेवरही प्रत्युत्तर देण्यात आले. त्यामुळे निवडणूक अधिकच रोचक बनली आहे.

बाळासाहेब थोरात यांनी शिंदेंवर उपरोधिक शब्दांत टीका केली. “सभेत तुम्ही जिथे त्या तिथे मंत्र्यांना फोन लावून ‘हे मंजूर, ते मंजूर’ असे आदेश देत होता. निवडणुकांच्या काळात अशी दिखाऊ कामे करावी लागतात, पण त्यालाही मर्यादा असावी,” असा टोला त्यांनी लगावला. शिंदेंच्या प्रत्येक मागणीवर ताबडतोब मंजुरी देणाऱ्या शैलीवर थोरातांनी उपरोधिक टीका केली. “हे जिथे जातील तिथे एमआयडीसी मंजूर करतात. लोक म्हणतात पाणी नाही, ते म्हणतात धरण मंजूर. लोक म्हणतात धरणासाठी नदी नाही, ते म्हणतात नदी मंजूर. नदीला पाणी नाही म्हणाले की डोंगरच मंजूर करतात! निवडणुकीत अशी बनवाबनवी करायची सवय तुम्हाला लागली आहे,” असे थोरातांनी सांगितले.

थोरात पुढे म्हणाले, “शिंदे संगमनेरमध्ये येऊन विकासासाठी मतदान करा म्हणत होते. पण त्यांनी आधी नगर-मनमाड महामार्गाचा प्रश्न सोडवावा. एवढ्या वर्षांत खासदार, आमदार, मंत्री असताना एक रस्ता नीट करू शकले नाहीत. आधी काम करा, मग विकासाच्या गोष्टी करा.”

Leave a Comment