दुर्दैवी! नगरपालिका निवडणुक लढविणाऱ्या महिला उमेदवाराचा मृत्यू

महाराष्ट्रात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांची लगबग सुरु असताना अकोल्यातून मोठी बातमी समोर आली आहे. अकोट नगर परिषद निवडणूकीत नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या अजित पवार गटातील उमेदवाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. अलमास परविन शेख सलीम असं मृत पावलेल्या उमेदवाराचं नाव आहे. पती आणि मुलाबरोबर माहेरी जात असताना त्यांचा अपघात झाला असून या अपघातात त्या मृत पावल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक पदाचे महिला उमेदवार अलमास परविन शेख सलीम या आज त्यांचे पती आणि मुलासोबत त्यांच्या माहेरी निघाल्या होत्या. या दरम्यान अमरावतीतील परतवाडा येथे एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अलमास परविन शेख सलीम या अकोट नगर पालिकेतील प्रभाग क्रमांक ४ च्या राष्ट्रवादीच्या नगरसेवक पदाच्या त्या अधिकृत उमेदवार होत्या. मात्र त्यांच्या अपघाती मृत्यूने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात शोकाकूल वातावरण निर्माण झालं आहे.

Leave a Comment