महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांमधील निवडणुकींमधील मतदानाला एका आठवड्यांचा कालवधी शिल्लक असतानाच निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का दिला आहे.
सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असतानाच निवडणूक आयोगाने एका महत्त्वाच्या प्रकरणामध्ये भाजपाविरोधात निकाल दिला आहे. यामुळे भाजपाला प्रचारादरम्यान फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेमकं हे प्रकरण काय आणि निवडणूक आयोगाचं म्हणणं काय आहे पाहूयात…
नेमका काय निर्णय दिलाय निवडणूक आयोगाने?
तर निवडणूक आयोगाने भाजपाला जो दणका दिला तो पक्षाच्या प्रचार गीतासंदर्भात आहे. भाजपाचे प्रचार गीत निवडणूक आयोगाने नाकारले आहे. हे प्रचार गीत वापरण्यास आयोगाने परवानगी देण्यास नकार दिला आहे. यामागील नेमकं कारण काय आहे हे सुद्धा निवडणूक आयोगाने नकार देताना कळवला आहे. प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अवभूत गुप्ते आणि प्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली सामंत यांनी गायलेल्या या गीतावर निवडणूक आयोगाने थेट काट मारली आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर फटका
मुंबईमध्ये यंदा उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरुद्ध भाजपा आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळेच ही निवडणूक दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेचा विषय बनवण्यात आली आहे. म्हणूनच मराठीच्या मुद्दाबरोबरच हिंदुत्वाचा मुद्दाही निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चांगलाच चर्चेत आहे. म्हणूनच मुंबई महापालिका प्रचारासाठी भाजपाने एक खास प्रचार गीत तयार केलं. मात्र हे गीत वापरण्यात निवडणूक आयोगाने नकार दिला आहे. म्हणूनच खर्च करुन मोठमोठ्या कलाकारांच्या माध्यमातून हे गीत तयार करुन घेतल्यानंतरही ऐन निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपाला वापरात येणार नाही. हे गीत का वापरता येणार नाही याचं कारणही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.
निवडणूक आयोगाने काय कारण दिलं?
सत्ताधारी भाजपाला दणका देणारा हा निर्णय का घेण्यात आला याचं कारणही निवडणूक आयोगाने दिलं आहे. या गाण्यामध्ये भगवा शब्द वापरण्यात आला असून त्यावरच निवडणूक आयोगाचा आक्षेप आहे. निवडणुक आयोगाने आचारसंहितेच्या निकषांचा आधार घेत ‘भगवा’ हा शब्द प्रचाराच्या कालावधीमध्ये अशाप्रकारे प्रचार गीतासाठी वापरणे आक्षेपार्ह प्रकारात मोडत असल्याचा ठपका ठेवत गीत प्रचारासाठी वापरण्यास परवानगी नाकारली आहे.
ठाकरेंनाही बसलेला फटका, त्यांच्यासोबत जे घडलं तेच भाजपासोबत
यापूर्वी 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाच्या ‘मशाल’ या अधिकृत प्रचार गीतामधील ‘हिंदू’ आणि ‘भवानी’ या शब्दांवर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला होता. आयोगाच्या मते, हे शब्द धार्मिक भावना दुखावणारे किंवा विशिष्ट धर्माचा आधार घेऊन मत मागण्यासारखे म्हणजेच आचारसंहितेचा भंग करणारे असू शकतात, असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे हे शब्द काढून टाकल्याशिवाय गाण्याला परवानगी देण्यास आयोगाने नकार दिला होता. असाच प्रकार आता भाजपासोबत घडला आहे.
