संगमनेर (DSNews24 /किरण पुरी) गावांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामविकास व पंचायतराज विभागांतर्गत “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” संपूर्ण राज्यात दिनांक १७ सप्टेंबर ते ३१ मार्च २०२६ यादरम्यान राबवण्यात येत आहे. लोकसहभागातून गावांचा सर्वसमावेशक विकास घडवण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे माध्यम ठरणार आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” अंतर्गत ग्रामपंचायतीने राबविलेल्या लोकाभिमुख कामांची अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी संगमनेर तालुक्यातील साकूर येथे गुरुवारी( दि. २२ जानेवारी ) प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आहे. तसेच प्रत्यक्ष कामांची पाहणी केल्यानंतर केलेल्या कामांच तोंडभरून कौतुक केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी साकूर शिवारातील खंडोबा डोंगराच्या पायथ्याशी ग्रामपंचायत अंतर्गत नक्षत्र घनवण उद्यान व तुलसी वृंदावनाची पाहणी केली. विशेषत; या वृंदावनात महर्षि पराषर व महर्षी वराहमिहीर यांचे गुल्म वृक्षा आयुर्वेद ग्रंथावर नक्षत्र घनवण वृक्ष लागवड करण्यात आली. तसेच ४४ प्रकारच्या विविध जातींचे २ हजार ९६० वृक्ष लागवड या वृंदावनात केली आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांना या वृंदावनाची संपुर्ण अचूक माहिती कृषी विस्तार अधिकारी अजितदानंद पावसे यांनी दिली. महाराष्ट्रातील हा पहिला प्रयोग असल्याने जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया हे वृंदावन बघून अक्षरशः भारावून गेले होते. त्यानंतर दगड, चुना माती व गवतापांसून बनविलेल्या छोट्या मोठ्या पारंपरिक वनराई बंधाऱ्याची देखील यावेळी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी पाहणी केली.
त्यानंतर घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, दकारर्गल ग्रंथ आधारवरती पाणी टंचाई मुक्त गाव करण्याकरीता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा उपसरपंच शंकरराव खेमनर यांनी नाविन्यपूर्ण प्रकल्पासंदर्भात माहिती दिली. यावेळी परिसरात बिबट्यांची काय परिस्थिती आहे याविषयी डॉ. पंकज आशिया यांनी परिस्थिती जाणून घेतली.
त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी थेट देऊबाई नामदेव कांबळे यांच्या शेतात जाऊन ई – पीक पाहणीविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी जागेवरच या शेतकऱ्यांची महसूलच्या अधिकाऱ्यांकडून पीक पाहणी करून घेतली. त्यानंतर साकूरमधील स्मशानभूमीची पाहणी केली. यावेळी स्मशानभूमीच्या जागेचा अधिकृत उतारा जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांच्या हस्ते ग्रामपंचायतीकडे वितरण करण्यात आला.
दरम्यान या पाहणीवेळी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी साकूर ग्रामपंचायतीने राबविलेल्या लोकाभिमुख विकासकामांच कौतुक केले. यावेळी साकूरला पुन्हा एकदा भेट देण्यासाठी नक्की येईल अशा शब्द जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांना दिला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर, तहसीलदार धीरज मांजरे, भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले, सरपंच सचिन सोनवणे, गटविकास अधिकारी प्रविण सिनारे, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, बालविकास प्रकल्प अधिकारी निलेश राऊत, विस्तार अधिकारी काशिनाथ सरोदे, कृषी विस्तार अधिकारी अजितदानंद पावसे, ग्रामविकास अधिकारी नागेश पाबळे, ग्राम महसूल अधिकारी सोमनाथ शेरमाळे, कैलास डोखे , रमेश पेंडभाजे, किशोर खेमनर, इसाक पटेल व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
