नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे गुरुवारी सायंकाळी दोन गटांमध्ये गोळीबाराची घटना घडली असून या घटनेत एकजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला. नितीन शिरसाठ याचा मृत्यू झाला असून सुरज फुलमाळी याच्यावर पुणे येथे उपचार सुरु आहेत. गुरुवार दि. 12 रोजी सायंकाळी 6:30 वाजता घोडेगाव येथील घोडेश्वरी रूग्णालयासमोर दोन गटांमध्ये गोळीबाराची घटना घडली. यात नितीन शिरसाठ (वय 33) यांच्या छातीवर गोळ्या लागल्याने त्याचा मृत्यू झाला. याच घटनेत सुरज फुलमाळी हा जखमी झाला.
गोळीबाराची घटना पोलिसांना समजताच सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, शिंगणापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यात शिरसाठ हे गंभीर जखमी झाले. दोघांना पोलिसांनी पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात हलवले. या रुग्णालय परिसरातही दोन गटामध्ये हाणामारी झाली. त्यानंतर सुरज फुलमाळी याला उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले. घोडेगाव येथे घटनास्थळी शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनी भेट दिली. घोडेगावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबाबत माहिती देताना याप्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे स्पष्ट केले. घोडेगाव हे अहिल्यानगर – संभाजीनगर महामार्गावरील अतिशय संवेदनशील ठिकाण आहे. घटना घडली त्यावेळी अचानक गोळीबाराच्या आवाजाने व्यापारी व ग्रामस्थ भयभीत झाले व सगळीकडे पळापळ झाली. सोनई पोलीस ठाणे हद्दीत गोळीबाराची दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. अंमळनेर येथे रोहित दरंदले याच्यावर जुन्या वादाच्या कारणावरून दोघांनी गोळ्या घातल्या. यात एक आरोपी अटक करण्यात आला असून एक फरार आहे.
