बापरे! साकूर परिसरात उष्णतेचा कहर ; तापमान चाळीशी पार 

संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) मागील काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील साकूर पठारभागातील नागरिक कडाक्याच्या उन्हाळ्याने हैराण झाले आहे. सूर्य उगवतानाच आग ओकत उगवत आहे. त्यामुळे पठारभाग उष्णतेने चांगलाच तापला आहे. त्यात आज मंगळवारी तापमानात वाढ होत ४१ अंशाचा आकडा पार केल्याने भरदिवसा रस्त्यांवर सामसूम झाली आहे. सकाळी १० वाजल्यानंतर अक्षरशः उन्हात गेल्यावर शरीर भाजून निघत आहे.

अचानक वाढलेले तापमान यामुळे पठार भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे. दुपारी शेतात काम करणेही शेतमजूरांना मुश्किल बनले आहे. ३६, ३८, ३९ अंशापर्यंत गेलेला तापमानाचा आकडा आज एकदम वाढला. मंगळवारी त्यात आणखी वाढ होऊन आकडा ४० पार गेला. सकाळपासून अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. वारा बंद आणि लाहीलाही करणारी सूर्यकिरणे यामुळे नागरिकांसह पशुपक्षीही हवालदील झाले आहेत. या उष्णतेच्या कहराने पठारभागातील दैनंदीन जीवनावर परिणाम झाला आहे. दुपारी १२ नंतर रस्ते, प्रमुख चौकात सामसूम दिसून येत होती.

यांनी काळजी घ्यावी

वाढती उष्णता लक्षात घेता वृद्ध, लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि उन्हाच्यावेळी कामानिमित्त घराबाहेर पडावे लागणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. थकवा, चक्कर येणे, ताप येणे असे प्रकार किंवा तशी काही लक्षणे आढळल्यास तत्काळ वैद्यकीय उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वैद्यकीय सल्ला, प्रशासनाचे आवाहन

अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे, हलका व पचण्यास सोपा आहार घ्यावा, घराबाहेर पडताना डोके, डोळे, कान झाकावेत, शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, नियमित द्रवपदार्थ सेवन करत रहावे

Leave a Comment