संगमनेरच्या तरूणाला नगरमध्ये अटक, नेमकं काय कारण?

अहिल्यानगर – शहरातील केडगाव बायपास परिसरात गावठी कट्टा बाळगणार्‍या संगमनेरच्या तरूणाला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे असा एकूण 83 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, त्याने ज्याच्याकडून हा कट्टा घेतला तो पसार झाला आहे.

याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार सुरज कदम यांनी फिर्याद दिली आहे. शहबाज निसार शेख (वय 34, रा. रहेमतनगर, जोर्वे नाका, तांबोळी हॉस्पिटलसमोर, संगमनेर, मुळ रा. एचडीएफसी बँकेशेजारी, सोनई, ता. नेवासा) असे ताब्यात घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. बुधवारी (20 मे) सायंकाळी 4.50 वाजण्याच्या सुमारास केडगाव बायपास रस्त्यावरील अनुराज टायर्स समोरील बंद पडलेल्या टपरीजवळ संशयित हालचाली करणार्‍या शहबाज निसार शेख यास ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे विनापरवाना एक लोखंडी स्टील रंगाचे गावठी बनावटीचा कट्टा आढळून आला. याशिवाय संशयिताकडून तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. असा एकूण 83 हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

संशयित आरोपीने हे शस्त्र केडगाव बायपास परिसरात एका अनोळखी इसमाकडून घेतल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे हे करीत आहेत.

Leave a Comment