साकूरमध्ये ऑप्युलन्स स्कूलने जपली भक्ती-संस्कृतीची परंपरा ; चिमुकल्यांच्या दिंडीने वेधले पंचक्रोशीचे लक्ष

संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने भक्ती आणि संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. मांडवे बुद्रुक येथील ऑप्युलन्स स्कूल ऑफ एज्युकेशनच्या वतीने पंढरीच्या वारीचे प्रतीक असलेल्या पारंपरिक दिंडीचे आयोजन करण्यात आले. धार्मिक परंपरेसोबतच विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, संत परंपरा आणि बालसंस्कार रुजविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. त्यामुळे चिमुकल्यांची ही दिंडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी विशेष आकर्षण ठरली.

ऑप्युलन्स स्कूलच्या वतीने वर्षभर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर साकूर चौफुली ते बसस्थानक असा पारंपरिक दिंडी सोहळा काढण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या हस्ते दिंडीची आरती करण्यात आली.

यावेळी दादाभाऊ खेमनर, रूपेश धुळगंड, तुषार धुळगंड, योगेश खेमनर, दिपक धुळगंड, ओंकार धुळगंड, भिमराज जाधव, भागवत कुदनर यांच्यासह पालकवर्ग उपस्थित होते

यानंतर बसस्थानक परिसरात विद्यार्थ्यांनी अभंगांवर आकर्षक नृत्य सादर केले. टाळ-मृदंगाच्या गजरात अखंड हरिनामाचा जप, अभंग, भजन आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांच्यासह विविध संतांच्या वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

आजच्या धावपळीच्या आणि पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली भारतीय परंपरा व संस्कार जपण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना लहान वयातच वारी परंपरा, संत साहित्य आणि भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्याचे महत्त्व ऑप्युलन्स स्कूलने या उपक्रमातून अधोरेखित केले.

मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावात भारतीय संस्कृतीचे जिवंत दर्शन घडविण्याचे काम या दिंडीने केले. हरिनामाचा गजर, संतांच्या विचारांची ओळख, सामूहिक शिस्त, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचा अनुभव विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मिळाला. त्यामुळे ही दिंडी केवळ मिरवणूक न ठरता संस्कारांची चालती-बोलती शाळा ठरल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्या सुरेखा पवार, उपप्राचार्या तृप्ती मोकळ, सांस्कृतिक विभाग प्रमुख रेश्मा केंगार तसेच शितल गाडेकर, स्नेहा खेमनर, शुभांगी बच्छाव, वृषाली बेलकर, धनश्री हिले, प्रवीण वर्पे, गणेश गिते, भगवान शेंडगे आणि स्वप्निल खैरनार यांनी विशेष परिश्रम घेतले.

 “भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात समृद्ध संस्कृतींपैकी एक आहे. पंढरपूरची वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून सामाजिक समता, बंधुभाव आणि संस्कारांचे विद्यापीठ आहे. विद्यार्थ्यांना बालपणापासून या संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी वर्षभर विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.”

बाबासाहेब कुटे, अध्यक्ष, ऑप्युलन्स स्कूल ऑफ एज्युकेशन

Leave a Comment