विद्या प्रबोधिनी प्रशालेचा अनोखा सोहळा ; ११०० विद्यार्थ्यांच्या दिंडीत फुगडी, गोल रिंगणातून आषाढी एकादशी साजरी

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त संगमनेर तालुक्यातील साकूर येथील विद्या प्रबोधिनी प्रशालेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे पारंपरिक दिंडी सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हातात टाळ, भगव्या पताका, मुखी “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “विठ्ठल विठ्ठल” चा अखंड नामघोष, तर टाळ-मृदुंगाच्या गजरात फुगडी, गोल रिंगण आणि पालखी सोहळ्यामुळे संपूर्ण साकूर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.

या दिंडी सोहळ्याचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष इंद्रजीत पा. खेमनर, उपाध्यक्ष शंकरराव पा. खेमनर आणि सचिव भाऊसाहेब सागर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्राचार्या गुलशन जमादार, मुख्याध्यापक सुभाष घुगरकर, रजिस्ट्रार हेमचंद्र होळकर, ह.भ.प. रूपेश महाराज नाईकवाडी, पालक, ग्रामस्थ आणि शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यंदाच्या दिंडीत सुमारे ११०० विद्यार्थी वारकरी वेशभूषेत सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी पांढरा कुर्ता-धोतर, गांधी टोपी, तर विद्यार्थीनींनी नऊवारी साडी परिधान करून हातात भगवे झेंडे, टाळ, मृदुंग आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेत वारकरी परंपरेचे दर्शन घडवले.

साकूर चौफुली ते बसस्थानक या मार्गावर निघालेल्या दिंडीत विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आदी संतांच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या आकर्षक सादरीकरणामुळे जणू पंढरपूरची वारीच साकूरमध्ये अवतरल्याचा अनुभव उपस्थितांना आला.

विशेष म्हणजे पंढरपूरच्या वारीप्रमाणे विद्यार्थ्यांनी गोल रिंगण साकारले, तर शिक्षकांनीही फुगडी खेळून या भक्तिमय सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. संपूर्ण शाळा परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमला होता.

वारकरी परंपरा, संत साहित्य आणि भारतीय संस्कृतीची ओळख विद्यार्थ्यांना लहान वयातच व्हावी, तसेच त्यांच्यात संस्कारमूल्ये रुजावीत या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्या प्रबोधिनी प्रशाला वर्षभर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवत असून, त्याचाच हा एक महत्त्वाचा भाग असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण मिसाळ यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Comment