महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी बीआरएस एकमेव पर्याय : संतोष वाडेकर

महाराष्ट्रातील जनतेने गेल्या पंचाहत्तर वर्षांत सर्वच राजकीय पक्षांना आलटून पालटून सत्ता दिली असली तरी सर्वच राजकीय पक्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास निष्फळ ठरले असुन बी.आर.एस.पार्टीच्या हातात महाराष्ट्राची सत्ता दिल्यास अवघ्या दिड वर्षात महाराष्ट्राचा कायापालट करण्याचा पार्टीचा संकल्प नांदेड येथील बी.आर.एस पक्षाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात करण्यात आला असुन मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणा राज्यात ४५० कल्याणकारी योजना राबवत अवघ्या आठ वर्षांत तेलंगणा राज्य प्रगत व विकासात्मक दृष्टीकोनातून भारतात एक नंबरचे मॉडेल बनविल्याने महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी बी.आर.एस हाच एकमेव पर्याय महाराष्ट्रातील जनतेसमोर शिल्लक असल्याचे मत नुकताच बी.आर.एस. मध्ये प्रवेश केलेले भुमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष श्री संतोष वाडेकर यांनी नांदेडमधील प्रशिक्षण घेऊन पारनेरमध्ये आल्यानंतर आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले आहे.

नुकतेच १९आणि २० मे रोजी दोन दिवस अनंता लॉन्स, गुरुजी चौक, पूर्णा रोड, नांदेड येथे बी.आर.एस. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरात प्रामुख्याने महाराष्ट्रातील २८८ मतदार संघातील पुरुष कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्या हजारांहून अधिक संख्येने संपुर्ण महाराष्ट्र राज्यातून उपस्थित होते.

यावेळी पारनेर तालुक्यातून श्री.संतोष वाडेकर, रावसाहेब झांबरे व वसंत साठे हे उपस्थित होते. त्यांच्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्वच कार्यकर्त्यांच्या राहण्याची सोय “पंजाब भवन” रेल्वे स्टेशन जवळ करण्यात आली होती. महाराष्ट्र मध्ये येणाऱ्या आगामी काळात पक्षाच्या वतीने हायटेक प्रचार करून रहदारी असणारे ठिकाण जसे की रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, शासकीय कार्यालय, आणि लोकांची रहदारी असणारे दर्शनी भागात मोठे, मोठे होल्डिंग बॅनर्सच्या माध्यमातून जाहिरात करण्याचे ठरले. संपूर्ण महाराष्ट्रात शहरी आणि ग्रामीण भागात हा हायटेक प्रचार केला जाणार असून प्रत्येक कार्यकर्त्यांना एक टॅब देण्यात येणार आहे त्याद्वारे मेंबरशिप ड्राईव्ह देण्यात येणार आहे.

कार्यकर्त्यांना इंटरनेट सर्व्हीसद्वारे दिल्लीतील पक्षाचे मुख्य कार्यालयाच्या लँनशी जोडण्यात येणार आहे, कुठल्या कार्यकर्त्यांनी आपल्या गावात, विभागात, वार्डात किती मेंबरशिप केली, याची तंतोतंत माहिती मुख्यमंत्री के.सी.आर. हे घेणार आहेत. पुढील काळात “अबकी बार किसान सरकार” हा नारा घरोघरी पोहोचवण्याचे सर्वानुमते ठरले आहे. तेलंगाना सरकारने केलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती घरोघरी पोहोचवावी असा एकूण या प्रचाराचा भाग राहणार असल्याचेही वाडेकर यांनी सांगितले.

नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी येथून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजे यांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी येथून प्रचाराचा नारळ फोडला जाणार असल्याचे कार्यक्रमादरम्यान ठरल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रचार साहित्यमध्ये पोस्टर्स, पॉम्प्लेट ,झेंडे ,पक्षाचे बिल्ले, आणि टोप्या यांच्या मोठ्या प्रमाणावरील समावेशावर भर देणार असल्याची माहिती वाडेकर यांनी दिली.

या शिबिरात विशेषतः शेतकरी संघटनेचे कर्मट कार्यकर्ते, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते, राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाचे कार्यकर्ते आणि आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे युवा आणि महिला कार्यकर्त्या, तसेच आदिवासी आणि मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचे सांगत तेलंगणा सरकारने ज्या लोकहिताच्या योजना राबवल्या आहेत जसे की, शेतकऱ्यांना प्रति एकर दहा हजार रुपये अनुदान, तसेच शेतकरी बांधवांचा नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या परिवाराला पाच लाख रुपयांची तात्काळ मदत, शेतकऱ्यांना २४ तास चांगल्या दर्जाची मोफत विज योजना, राज्यातील दलित बांधवा करिता ‘दलित बंधू’ योजना या योजनेतून दलित परिवार उद्योग समूहात कसा जोडला जाईल.

त्याकरिता दहा लाख रुपयांची स्वयंरोजगारा करिता आर्थिक मदत, देशात कुठेही नाही इतका भव्य दिव्य १२५ फुटांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि अलीकडे तेलंगाना सरकारच्या सचिवालयाला परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले तथा महिला प्रसुती नंतर तिला के.सी.आर. किट तसेच बारा हजार रुपयाची आर्थिक मदत, कन्या झाल्यास १३ हजार रुपये आर्थिक मदत, तथा अंध,अपंग यांना ३५०० रुपये दरमहा पेन्शन योजना, ज्येष्ठ नागरिकां करिता २५०० रुपये पेन्शन योजना, आणि तेलंगाना मध्ये शेतकऱ्यांची एकही आत्महत्या होत नसल्याचा धुवाधार प्रचार महाराष्ट्रात होणार असून महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपालिका महानगरपालिका, तसेच विधानसभा आणि लोकसभा या सर्व निवडणुका पक्ष ताकदीनिशी लढवणार असल्याची माहिती भारत राष्ट्रीय समितीचे जेष्ठ नेते माजी खासदार हरीसिंग राठोड यांनी दिल्याचेही संतोष वाडेकर यांनी स्पष्ट केले.

 

“महाराष्ट्राची सत्ता आमच्या हाती द्या आम्ही तेलंगणा राज्यात राबविण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांतून आलेल्या अनुभवांच्या जोरावर महाराष्ट्राचा कायापालट करत अवघ्या दिड वर्षात महाराष्ट्रदेखील मॉडेल बनवून दाखवू.”

– के.चंद्रशेखर राव :- मुख्यमंत्री तेलंगणा राज्य

Leave a Comment