विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर राज्य विधिमंडळातील गणितेच फिरली आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेता कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची घोषणा केली असली तरी ते पद काँग्रेसकडे जाणार आहे.
आता त्या पदावर विविध नावांची चर्चा असली तरी तूर्तास बाळासाहेब थोरात यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. कारण विधानसभेत काँग्रेसचे सर्वाधिक ४५आमदार असून सध्या बाळासाहेब थोरात हे सर्वात ज्येष्ठ आमदार असून विधीमंडळ पक्षनेते आहेत.
शिवसेना पक्षात बंडाचा झेंडा फडकावून उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ३० जून २०२२ रोजी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
या सरकारने नुकतीच वर्षपूर्ती साजरी केली. त्यानंतर २ जुलै २०२३ रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या समर्थक ८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी पक्षही सहभागी झाला आहे.
दरम्यान विरोधी पक्ष नेतेपदासाठी काँग्रेसमधून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि नाना पटोले यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र विधानसभेतील गटनेते बाळासाहेब थोरात असल्याने त्यांचीच निवड होईल. कारण ते गांधी कुटुंबियांंशी सर्वात जास्त प्रमाणिक आहेत.
