मुंबई : सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दहावा दिवस. रोजच्या सारखी आजही विधान भवनात मंत्र्यासह आमदारांची, प्रशासकिय अधिकाऱ्यांची वर्दळ. मंत्री येत होते विधानभवनात जात होते. कुणी प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते तर कुणी पायऱ्यावर बसून सरकारविरोधात घोषणाबाजी करीत होते.
अशा या वातावरणात विधानभवनात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एंट्री झाली. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल ना?, पण विधानभवनात अवतरलेली ती व्यक्ती पंतप्रधान मोदी नव्हे तर त्यांच्यासारखी दिसणारी होती. यावेळी मात्र, कॉंग्रेसच्या बाळासाहेब थोरातांनी त्यांना उद्देशून मारलेल्या टोल्याचीच जास्त चर्चा आज विधानभवनात रंगत होती.
सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन या ना त्या कारणाने चांगलेच गाजत आहे. सत्ताधारी-विरोधकांतील संघर्षाने तेथील वातावरण तापत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या मंगळवारी पुण्यात येत आहेत.
मोदींच्या दौऱ्यामुळेच सोमवारी, मंगळवारी अधिवेशनाचे कामकाज बंद ठेवल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. अशातच आज मोदींसारखी दिसणारी व्यक्ती विधानभवन परिसरात प्रगटताच पुन्हा चर्चांना उधाण आले होते.
विधानभवनाच्या आवारात मोदींसारखी दिसणारे विकास महंत आले. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांच्या हातात हात दिला. यावेळी त्यांच्याभोवती लोकांसह माध्यम प्रतिनिधींनीही गलका घातला होता. हे टायमिंग साधत थोरातांनीही भाजपसह मोदींवर बोचरी टीका केली.
मंहतांच्या हातात हात देत थोरात म्हणाले, “हे फक्त मोदींसारखे दिसतात, यांना खोटे बोलता येत नाही.” थोरातांच्या या अचूक टायमिंगची चर्चा दिवसभर विधानभवन परिसरात होती.
