संगमनेर (DSNews24/किरण पुरी) नाशिक – पुणे हायवेवरील आळे खिंडीत जबरी चोरी करणाऱ्या तीन संशयित आरोपींच्या मुसक्या आवळण्यास व आळेफाटा पोलीस स्टेशनकडील जबरी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेला उघड करण्यास मोठं यश आले आहे.
अधिक माहिती अशी आहे की, सचिन रमेश सानप, रा. रूम नं.७०६, फेज १ विस्पलिंग सोसायटी, बाणेर, पुणे हे मौजे संतवाडी, ता जुन्नर, जि पुणे गावच्या हद्दीत १९ जुलै रात्री ११ वाजेच्या सुमारास फाउंटन हॉटेलच्या समोरील नाशिक पुणे हायवे रोडच्या आळेखिंड मध्ये रस्त्याचे कडेला पाऊस आल्याने थांबले होते. तसेच ते आपला मोबाईल पॅन्टच्या खिशामध्ये ठेवत असताना त्यांच्या शेजारी एक पांढरे रंगाची ओमनी कार येऊन त्यातील दोघेजण खाली उतरले. त्यातील एकाने सचिन सानप यांच्या पॅन्टचे खिशातील मोबाईल हा जबरदस्तीने काढून घेतला व त्यातील एक जण त्यांची मोटरसायकल जबरदस्तीने ओढत असल्याने सानप यांनी आरडाओरड करत फाउंटन हॉटेलकडे गेले.
त्यानंतर ते दोघे ओमनी कार मध्ये बसून सानप यांचा मोबाईल घेऊन पुणे बाजूकडे निघून गेले होते. याबाब आळेफाटा पो.स्टे गु.र.नं ३७१/२०२३ भादवि ३९२,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी जबरी चोरी व गंभीर गुन्हे उघडकीस आणणेकामी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आदेश दिला होता.
त्यानंतर वरिष्ठ पो.नि.अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रा. यांचे आदेशाने एलसीबी चे पथक सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना तांत्रिक विश्लेषणाच्या व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा संशयित प्रशांत अण्णासाहेब जाधव वय २३ वर्षे, रा. सावरगाव पाट, ता. अकोले, जि. अहमदनगर याने त्याचे साथीदारांसह केल्याची माहिती मिळाल्याने त्यास नारायणगाव परिसरातून ताब्यात घेऊन त्याचेकडे गुन्ह्याचा तपास केला असता सदरचा गुन्हा त्याने त्याचे अन्य साथीदार नामे सचिन पवार व शिवतेज नेहे दोन्ही रा. सावरगाव पाट, ता. अकोले, जि. अहमदनगर यांचे मदतीने केल्याची कबुली दिल्याने संशयित आरोपी सचिन जयराम पवार, वय ३० वर्षे, रा. सावरगाव पाट, ता. अकोले, जि. अहमदनगर, शिवतेज चंद्रहर्ष नेहे वय २६ वर्षे,रा. सावरगाव पाट, ता. अकोले, जि. अहमदनगर यांना आळेफाटा येथून ताब्यात घेण्यात आले.
तसेच त्यांच्याकडून रियल मी कंपनीचा 7 प्रो मॉडेलचा मोबाईल फोन व पांढरे रंगाची मारुती सुझुकी कंपनीची ओमनी गाडी नंबर एम एच १५, जीएफ ७२८८ ताब्यात घेण्यात आली आहे. सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी आळेफाटा पोस्टे चे ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस उप निरीक्षक अभिजित सावंत, पो. हवा दिपक साबळे, पो. हवा.राजू मोमीन, पो.ना. संदीप वारे, पो.कॉ. अक्षय नवले, पो.कॉ. निलेश सुपेकर यांनी केली आहे
