ब्रेक फेल झालेली एसटी बस वाळूच्या ढिगाऱ्यावर चढवल्याने अनेक प्रवाशांचा जीव वाचला. बस चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली.
अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द गावात रविवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. पंढरपूरहून नाशिकला निघालेल्या बसचे फेल ब्रेक झाले होते.
शिवाय काही अंतरावर नदीवरील मोठा पूल होता. ही बाब लक्षात घेऊन चालकाने बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी वाळूच्या डेपोवर बस चढवली. त्यामुळे बस थांबली आणि मोठा अनर्थ टळला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशांचा जीव वाचला.
महामंडळाची बस प्रवाशांनी खचाखच भरलेली होती. बस थांबल्यानंतर तिथे उपस्थित ग्रामस्थांनी आपत्कालीन दरवाजातून प्रवाशांना बाहेर काढले.
सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. चालकामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी एसटी महामंडळाच्या बसची दूरवस्था या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आली आहे.
