साकूर परिसरात आता नविन दहशत, दिवसाढवळ्या झाला हल्ला

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर सह परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा संचार सुरू आहे. तसेच अनेकदा बिबट्याने हल्ले करत गाय, वासरू, शेळ्या, मेंढ्यांचा फडशा पाडला आहे.

परंतु बिबट्याला जेरबंद करण्यास अद्यापही वनविभागाला यश आले नाही. नागरिकांनी वारंवार पिंजरा लावण्याची मागणी करूनही वनविभागाने दुर्लक्ष केले आहे. दोन तीन दिवसांपूर्वी साकूर येथील लोंढे मळ्यात भरदिवसा बिबट्याने हल्ला करत शेळीचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे.

शेतात मजूर काम करत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने बांदावर चरत असलेल्या शेळीवर हल्ला करत ठार केले. सुदैवाने मजूरांवर बिबट्याने कोणतीही चाल न केल्याने ते वाचले आहे.

दिवसाढवळ्या बिबट्याचा संचार सुरू असल्याने शेतकरी, शेतमजूरांना शेतात काम करणे अवघड होऊन बसले आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave a Comment