पुढच्यावर्षी लोकसभा निवडणुका होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विरोधकांची इंडिया आघाडीही तयार झाली आहे.
या इंडिया आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपने एनडीएचं पुनरुज्जीवन केलं आहे. त्यामुळे आगामी निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
मात्र, या निवडणुकीवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं भाकीत केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
प्रकाश आंबेडकर औरंगाबादमध्ये आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला असता लोकसभा निवडणुकीबाबत मोठं भाकीत केलं आहे.
लोकसभेच्या निवडणुका महिना दीड महिन्यात होतील. दीड महिन्यानंतर विचारा कशा काय होतील? त्यावेळी सांगतो. आम्ही लोकसभा निवडणुकीच्या तयारी लागलो आहोत. भाजपच्या विरोधात लढू. आमचे उमेदवार उभे करू, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
