शरद पवारांच्या कोल्हापुरातील सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी अजित पवार गटाने कोल्हापुरात सभा घेतली.
कोल्हापुरातील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की अजित पवार आणि बाकिच्या लोकांनी असा निर्णय का घेतला?
यावर काहीजण सांगतात आमच्यावर दबाव होता, आमच्यावर दबाव असल्याची टीका होते. जरूर आमच्यावर दबाव होता, परंतु मला एकच सांगायचं आहे की आमच्यावर लोकांची कामं पूर्ण करण्याचा दबाव होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, अडीच वर्ष आम्ही सरकारमध्ये काम करत असताना आम्ही जनतेची अनेक कामं हाती घेतली होती. हाती घेतलेली कामं पूर्ण करण्याचा दबाव आमच्यावर होता.
आमदारांच्या कामांना स्थगिती होती, ती स्थगिती उठवण्याचा दबाव आमच्यावर होता. यासाठी आम्ही सरकारमध्ये सामील झालो यात आमची काय चूक झाली? याव्यतिरिक्त दुसरा कुठलाही दबाव आमच्यावर नव्हता.
अजित पवार म्हणाले, आम्ही कुठल्याही दबावाला भिक घालणारी माणसं नाही. आम्ही पण मराठ्याची अवलाद आहोत, शेतकऱ्याची मुलं आहोत. वेगवेगळ्या प्रकारे आमची बदनामी करण्याचे प्रकार सुरू आहेत. परंतु,त्यात काही तथ्य नाही. मला एकच सांगायचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारांनी चालणारा पक्ष आहे आणि आम्ही त्याच मार्गाने चालत आहोत.
