Ajit Pawar : भाजप पाठिंब्यावर अजित पवार मुख्यमंत्री?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ४० हून अधिक आमदारांना आपल्याबरोबर घेऊन अजित पवार यांनी वेगळा गट बनवला. सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाशी हातमिळवणी केली. उपमुख्यमंत्रीपद मिळवून आणि सोबतच्या ९ सहकाऱ्यांना मंत्रिपदे देऊन महाराष्ट्राच्या सत्तेत वाटेकरी झाले.

गेल्या साडेतीन महिन्यांपासून अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. ते महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून आता अजित पवार (Ajit Pawar) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावा त्यांच्या समर्थकांसह विविध पक्षांतील नेत्यांकडून केला जात आहे…

विरोधी पक्षांतील नेते अथवा अजित पवारांचे समर्थक, अनेकांनी अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील असे भाकीत केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अजितदादांना मुख्यमंत्री करण्याबाबत जाहीरपणे बोलून दाखविल्याने अजित पवार यांच्यासह त्यांच्या समर्थकांच्या अपेक्षा उंचावणे साहजिकच आहे.

अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं असेल तर त्यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करू, वेळ येईल तेव्हा त्यांना मुख्यमंत्री करू’,असे फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे आता अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांना अधिक ऊत आला आहे. परंतु, अजित पवार नेमके मुख्यमंत्री भाजपच्या (BJP) पाठिंब्याने बनणार की स्वत:च्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांच्या पाठिंब्यावर? याबाबतही चर्चांना जोर चढला आहे.

अजित पवारांना मुख्यमंत्री बनायचे असेल तर त्यांना १४५ हून अधिक आमदारांचा पाठिंबा असायला हवा. अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्री होण्यासाठी १४५ चा जादुई आकडा गाठावा लागेल, असे म्हटले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री होण्यासाठी अजित पवार १४५ चा आकडा गाठणार तरी कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे. अजित पवारांना भाजपच्या पाठिंब्यावरसुद्धा मुख्यमंत्री बनवले जाऊ शकते अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत

Leave a Comment