हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी राजीनामा दिला आहे. मराठा समाजातील आरक्षणाच्या मागणी करावी यासाठी काही आंदोलक त्यांच्या भेटीसाठी गेले असता त्या ठिकाणी आंदोलकांनी खासदारकीचा राजीनामा द्या अशी मागणी केली.
त्यानंतर हेमंत पाटलांनी तात्काळ लोकसभा अध्यक्षांच्या नावाने राजीनामा लिहून आंदोलकांना दिला.
हेमंत पाटील हे हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून गेले आहेत. मराठा आरक्षणासाठी एखाद्या आमदार वा खासदाराने दिलेला हा पहिलाच राजीनामा आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक होत मराठा बांधवांनी खासदार हेमंत पाटील यांना घेराव घालून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि त्यानंतर खासदार पाटील यांनी आपला राजीनामा लोकसभा अध्यक्षांच्या नावाने लिहिला आहे. यवतमाळच्या पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना येथे खासदार पाटील आले असता त्यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला.
यावेळी आमदार खासदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मराठा आरक्षणप्रश्नी आपण दिल्ली येथे खासदारांची बैठक बोलाविली मात्र मराठा बांधवांची मागणी असेल तर एक मिनिटात राजीनामा देतो असे खासदार पाटील यांनी यावेळी सांगितले. व लागलीच लोकसभा अध्यक्षांच्या नावे आपला राजीनामा लिहिला.
खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पत्रामध्ये म्हटलंय की, महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत. मी अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी भांडणारा कार्यकर्ता आहे. आरक्षणाच्या आंदोलनासाठी माझा पाठींबा असून आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.
असं पत्र लोकसभा अध्यक्षांच्या नावे रविवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी खासदार हेमंत पाटील यांनी लिहिलं आहे.
