सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विविध ठिकाणी आंदोलने सुरु असून अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. काल अजित पवार (Ajit Pawar) बारामती तालुक्यातील माळेगाव कारखान्याच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले होते. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने नेत्यांना गावबंदीचा निर्णय घेतल्याने अजित पवारांनी हा दौरा स्थगित केल्याचे बोलले जात होते.
अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काल डेंग्यू (Dengue) झाल्याचे निदान झाले असून त्यांना पुढील काही दिवस वैद्यकीय उपचार आणि विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे, असे ट्विट राष्ट्रवादी-अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे. तसेच प्रकृतीत सुधारणा झाल्यावर अजित पवार पुन्हा कामाला सुरुवात करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे की, अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहत नसल्यावरून प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या दिल्या जात आहेत. मी हे स्पष्ट करू इच्छितो की कालपासून त्यांना डेंग्यूचे निदान झाले आहे आणि त्यांना पुढील काही दिवस वैद्यकीय मदत आणि विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
अजित पवार हे त्यांच्या जनसेवेच्या जबाबदाऱ्यांसाठी कटिबद्ध आहेत. एकदा ते पूर्णपणे बरे झाले की, ते आपली समर्पित सार्वजनिक कर्तव्ये पुढे चालू ठेवण्यासाठी पूर्ण शक्तीने परत येतील, असे पटेल आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
