नाशिकसह राज्यभरात शेतमालाच्या घसरलेल्या दरावरून आणि अवकाळी पाऊसाचा तडाख्यामुळे कृषी क्षेत्र हवालदिल झाले आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांविरोधात जनरोष वाढतो आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे (ncp) सर्वेसर्वा, खासदार शरद पवार (MP Sharad Pawar) आज नाशिक दौऱ्यावर असताना काय भाष्य करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले, ते म्हणाले, कांद्याचा प्रश्न अतिशय गंभीर असून फक्त नाशिकच नाही तर राज्याच्या इतर भागातही कांद्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे राज्यसरकारने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
कांद्याला निदान १२०० रुपये भाव मिळावा ही मागणी शेतकऱ्यांनी आज माझ्याकडे केली असेही पवार म्हणाले, कांद्याच्या निर्यातीबाबत केंद्र आणि अन्य यंत्रणांनी मोठा कार्यक्रम राबवला पाहिजे असे देखील त्यांनी सुचविले आहे. तसेच कांद्याचा प्रश्न राज्यसभेत मांडणार असल्याचे देखील यावेळी पवार यांनी सांगितले आहे.
नागालँडमध्ये भाजपसोबत का गेलो?
नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिल्याने शरद पवार यांच्यावर टीका होत आहे. यासंदर्भात आज त्यांनी स्वतः भूमिका स्पष्ट केली.
नागालँडमध्ये (Nagaland) भाजपसोबत जाण्याला आमच्या सात आमदारांनी विरोधच केलेला होता. मात्र नागालँडमधली परिस्थिती इतर राज्यांपेक्षा वेगळी आहे. नागालँडमध्ये कुठलाच पक्ष बाहेर राहिलेला नाही. नागालँडमध्ये नागा लोकांचे मुद्दे आहेत.
त्यामुळे सत्तास्थापनेमध्ये ऐक्य म्हत्वाचे होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर सर्वांनी सोबत राहण्याचा विचार केला आहे. त्यामुळे भाजपसोबत आम्ही गेलो, असा त्याचा अर्थ होत नाही; अशी भूमिका पवारांना स्पष्ट केली.
