शिर्डी (Shirdi) लग्नातील जेवणातून अनेकांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. साई पालखी निवारा येथे रविवारी एक लग्न होतं. दुपारी लग्न लागल्यानंतर पाहुण्यांना जेवण वाढण्यात आलं होतं.
जेवणानंतर वऱ्हाडी मंडळींना मळमळ, उलट्या तसंच जुलाबाचा त्रास झाला. त्यानंतर वऱ्हाडी मंडळींना तातडीनं साई संस्थानच्या साईनाथ तसंच साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. आतापर्यंत वीस ते पंचवीस जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती मिळत आहे.
शिर्डीजवळील साई पालखी निवारा येथे रविवारी एक विवाहा पार पडला. या विवाह सोहळ्यात आलेल्या वराडी पाहुण्यांना जेवणात रबडी, कोबी भाजी, पनीर भाजी, डाळ, भात, पुरी, चपाती असं जेवण ठेवण्यात आलं होतं. मात्र, दुपारी जेवण झाल्यानंतर अनेकांना अचानक उलट्या, पोट दुखीचा त्रास जाणवत होता.
तर काहींना मळमळसह उलट्या झाल्या. त्यामुळं जेवणातून विषबाधा झालेल्या वऱ्हाडींना शिर्डीतील साईबाबा हॉस्पिटलमध्ये तसंच काहींना साईनाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. यामध्ये लहान मुलांसह महिला, पुरुषांचा समावेश आहे.
शिर्डीतील एका व्यावसायिकाच्या मुलीचा विवाह साई पालखी निवारा येथे पार पडला. या लग्नाला मोठ्या संख्येनं पाहूण्यांची गर्दी होती. मात्र, दुपारी लग्नसमारंभात जेवण केल्यानंतर अनेकांना अन्नातून विषबाधा झाली.
त्यामुळं एकच गोंधळ उडाला. आतापर्यंत सुमारे 60 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं साई संस्थानच्या वैद्यकीय संचालकांनी सांगितलं.
