संगमनेर : तालुक्याच्या पठार भागातील जांबूत बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एल इ डी टिव्हीची( LED TV) चोरी झाली आहे. तर ही घटना गुरुवारी दिनांक ९ मार्च रोजी घडली आहे.
याबाबत घारगांव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जांबुत बुद्रुक येथे इयत्ता पहीली ते सातवी पर्यंतची शाळा आहे. व या शाळेत विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता यावा तसेच दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून एल इ डी टिव्ही बसविण्यात आले आहेत.
त्यात चौथीच्या वर्गातही एल इ डी टिव्ही बसविण्यात आला होता. मात्र कुणीतरी अज्ञात चोरट्याने चौथीच्या वर्गाचा कडी कोयंडा कशाच्या तरी सहाय्याने उचकटून एअरटेक कंपनीचा दहा हजार रुपये किंमतीचा एल इ डी टिव्ही चोरून पोबारा केला. दरम्यान १० मार्च रोजी सकाळी शिक्षक शाळेत आल्यानंतर त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली.
याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय आनंदराव फापाळे यांच्या फिर्यादीवरून घारगांव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाबुराव गोडे करत आहेत.
