मुंबई (DSNews24/किरण पुरी) पुण्यातील ५ नंबर न्यायालयात १९८६ साली जिल्हा सत्र न्यायाधीश म्हणून कार्यरत असलेले नारायण गोसावी यांच्यासोबत एक मोठा प्रसंग घडला होता. नेमका काय प्रसंग घडला याचा उलगडा स्वतः नारायण गोसावी यांनी केलाय.
नेमका काय प्रसंग घडलाय हे जाणून घेऊयात….
जून १९८६ माझी बदली पुणे पाच नंबर कोर्टात झाली. निवासस्थान ८ , क्वीन्स गार्डन्स होते. ऑगस्टच्या पहिल्या रविवारी जनरल अरुणकुमार वैद्य यांची दूरदर्शन वर मुलाखत होती. ती संपूर्ण बघितली. दोन तीन दिवसांनी म टा च्या आतील पानावर एक छोटीशीच बातमी आली होती. ” जनरल वैद्य यांनी त्यांना आलेली धमकीचे पत्रे पोलीस आयुक्तांकडे दिली.” मध्ये साधारण पणे तीन एक दिवस गेले. रविवार होता. तारीख होती १० ऑगस्ट १९८६ सकाळी सुमारे अकरा वाजता दोन पोलीस अधिकारी माझे निवासस्थानी आले आणि त्यांनी सांगितले की प्रकाश पवार, पोलीस ऊपायुक्त (गुन्हे) , यांनी मृत्युपूर्व जबाब नोंदवून घेण्यासाठी त्वरित मला आणण्याची विनंती केली आहे. ” मी त्या अधिकाऱ्यांना सांगितले, हे काम कार्यकारी दंडाधिकारी करतात, मी नव्हे. पण त्यांचा आग्रह चालूच राहीला. प्रकाश पवार माझे पण मित्र असल्याने मी जाणेस तयार झालो. पोलीस गाडी सदर्न कमाड समोरून जात असतांना तो आडवा रोड बंद केलेला दिसला. मी सहज माझी नजर पोलीस अधिकाऱ्यांकडे वळविली, तेंव्हा एक जण म्हणाला ” साहेब , इथेच फायरिंग झाली ” कोणावर, काय वगैरे काहीच बोलला नाही. मला ही ऊत्सुकता नव्हती. पुढे गाडी वानवडी आर्मी हाॅस्पिटलला आली.
तेंव्हा मी विचारले ईकडे कशाला? ऊत्तर आले ” जनरल अरुणकुमार वैद्य यांचेवर फायरिंग झाले होते आणि त्यांना व त्यांच्या जखमी पत्नी यांना आर्मी हाॅस्पिटल मध्ये आणले आहे. पहील्या आर्मी गेट वर परवानगी घेऊन आम्ही आत आलो. समोर सतीष माथूर, पोलीस ऊपायुक्त (झोन-१) आणि प्रकाश पवार, पोलीस ऊपायुक्त (गुन्हे) यांनी मला शिरस्त्यानुसार सॅल्युट करून रिसीव्ह केले. आमची चर्चा चालू असतांनाच तिथे एक ब्रिगेडियर दर्जाचा अधिकारी आला. माथूर आणि पवार यांनी सॅल्युट करून मृत्युपूर्व जबाबासाठी मॅजिस्ट्रेट साहेब यांना आणले आहे असे सांगितल्या बरोबर ब्रिगेडियर खवळला, ” You bloody basterds, our General was shot on road, what you pigs were doing ? Now you are telling about dying declaration of our bravo dead General ! ” या वर प्रकाश पवारांनी अजून आगीत तेल ओतले, ते म्हणाले , ” No Sir, we have brought Magistrate to record the Dying Declaration of Mrs Vaidhya ” झालं, आग लागलेलीच होती आता वनवा लागला. ब्रिगेडियरने धुवाँधार गोळीबार करावा, तसा पोलीस अधिकाऱ्यांवर रागाचा, ××× चा भडिमार सुरू केला आणि विचारले ” who told you bloody that we will allow her to die. At any cost we will save her life” एकूण रागरंग बघता, मी माथूर आणि पवार यांना हळूच म्हणालो, तुम्हाला मार खायचा असेल तर जरूर खा, मी चाललो. असे म्हणून मी पोलीस वाहनचालक यास सांगितले मला त्वरित माझे निवासस्थानी सोड. त्या प्रमाणे त्याने मला घरी सोडले.
पुढे दिड दोन महिन्यातच जनरल अरुणकुमार यांचे मारेकरी पैकी सुखा आणि निमा यांना मोटारसायकल वरून जात असताना सिनेमा स्टाईल ने पिंपरी-चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक पठाण आणि ऊपनिरीक्षक भरत निंबाळकर यांनी पकडले. पुढे सुखाचा कबुलीजबाब पण घेण्यात आला. सुखाची पोलीस आयुक्त यांना पत्राद्वारे दिलेल्या धमकीची केस माझ्याच पुढे चालली. त्यात त्याला मी शिक्षा केली. नंतर जिंदा, अवतारसिंग, बिंदा असे अनेक खलिस्तानी अतिरेकी माझेपुढे हजर करण्यात आले. त्यापैकी एक जिंदा.. याने माझे कोर्टात पोलीस आणि सर्वांनाच शिवीगाळ केली. मी डायसवरून चेंबर मध्ये आलो. माझे कमरेचे “बरेटा” पिस्तोल काढून समोर टेबलावर ठेवले. पोलीसांना जिंदाला आत चेंबर मध्ये आणायले सांगितले. त्याप्रमाणे त्याला चेंबर मध्ये आणले. तो धुमसतच होता. नीट चौकशी करता लक्षात आले पोलीसांकडून चुकून त्याच्या पगडीला धक्का लागला होता. मी त्याला ईतरांना का शिवीगाळ करतो असे विचारले तर तो म्हणाला ऐसे कितने को तो मै मार चुका हूँ ! तुम क्या करोगे?
मग मी शांतपणे ऊठलो. माझे टेबलावरील पिस्तोल हातात घेऊन मॅगझिन बाहेर काढून ते गोळ्यांनी भरलेले असलेची खात्री केली. जिंदा हे सर्व बघत होता. त्याची मग्रूरी किंचित कमी झालेली जाणवली. मी मॅगझिन आत टाकून पिस्तोलचा खटका मागे ओढून पिस्तोल लोड केले. शांतपणे पिस्तुलाची नळी त्याच्या डोक्यावर टेकवली. आता त्याची थरथर जाणवू लागली होती. बंदोबस्ताला आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना देखील काय करावे हे कळेना. मी शांतपणे जिंदाला म्हणलो, अब देख , मै तेरा पुरा भेजा बाहर निकालता हूँ, तू तो यही पर मरेगा मगर तेरा एन्काऊंटर बताकर मैरे ऊपर कोई केस नही बनेगा! आता जिंदा पूर्ण घाबरला होता आणि जिवाची भीक मागत होता. मी सलग पुढील तीन वर्षे पुणे पाच नंबर कोर्टातच होतो, पण एकाही अतिरेक्याने अगर नामचीन गुंडाने माझ्या कोर्टात बेशिस्त वागण्याचा प्रयत्न केला नाही. हो, पत्र , फोन या द्वारे धमक्या अनेक वेळा आल्या, पण मी कायम खंबीर राहीलो. अगदी ” झेड ” दर्जाची सुरक्षा अनेक वर्षे असतांनी मोकळेपणे वावरलो.
जनरल अरुणकुमार यांचेवर तीन गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. पैकी एक गोळी अरुणकुमार यांचे मानेच्या कातडीतून बाहेर पडून मिसेस वैद्य यांच्या कमरे जवळील मांडीत घुसली होती. घटनेचे वेळेस जनरल अरुणकुमार स्वत: मारूती गाडी चालवत होते. शेजारील शिटवर मिसेस वैद्य बसल्या होत्या. आणि पोलीस चा एकमेव बाॅडीगार्ड मागील शिटवर रिकामे रिव्हॉल्व्हर घेऊन गोळ्या वेगळ्या पिशवीत ठेवून बसला होता. गाडी सदर्न कमांड वरून पुढे ऊजवी कडे वळत असतानाच मोटारसायकल वरून पाठलाग करणारे जिंदा आणि सुखा यांनी गाडी ओव्हर टेक करीत असतानाच तीन गोळ्या झाडल्या. पैकी एक डोक्यात शिरली, दुसर्या दोन मान आणि मांडीत लागल्या. त्या अवस्थेत ही जनरल अरुणकुमार यांनी गाडी ऊजवी कडील वडाला किंचित धडकवून ऊभी केली. जिंदा आणि सुखा फायरिंग करून क्षणात सोलापूर हायवे वरून साळूंखे विहार वर मोटारसायकल, हत्यारे ठेवून फरार झाले.
ईकडे, गाडी वडाच्या झाडाला आदळून ऊभी रहात असतांनाच मिसेस वैद्य यांनी मदती साठी ओरडा सुरू केला. सुदैवाने आर्मीचे वहान तेथे थांबले आणि त्यातील जवानांनी वैद्य दांपत्यास वानवडी आर्मी हाॅस्पिटल मध्ये हलविले. डोक्यात लागलेल्या गोळीमुळे हाॅस्पिटल मध्ये नेईपर्यंत जनरल अरुणकुमार यांचा अंत झाला तर ऊपचारामुळे मिसेस भानुमती वैद्य वाचल्या. हवालदार क्षीरसागर याने त्वरित FIR बंडगार्डन पोलीस स्टेशन ला दिला. कार्यक्षेत्र माझेच कडे असलेने काॅपी माझे कडे देण्यात आली.
कर्मधर्म संयोग असा की , दुसर्याच दिवसापासून मला बाॅडीगार्ड देण्यात आला आणि पहीलाच माझा बाॅडीगार्ड होता तो तोच “क्षीरसागर ” .. मला हसावे रडावे हेच कळेना. दुसर्याच दिवसी मी अशोक धिवरे , पोलीस ऊपायुक्त (विशेष शाखा) , यांना बोलावून घेतले आणि त्यांना सरळ प्रश्न विचारला, ” पुणे पोलिसांची आणि अतिरेक्यांची काही हातमिळवणी आहे काय?” अर्थात अशोक धिवरे क्षणभर एकदम ऊडालेच. त्यांना मला “बाॅडीगार्ड ” क्षीरसागर देण्यात आला आहे, हे सांगितल्यावर त्यांची ट्युब पेटली. त्यांनी लगेच वायरलेस वरून क्षीरसागर ची बदली दुसरे शार्प बाॅडीगार्ड माझे सुरक्षा व्यवस्थेत पुरविले. सर्वच प्रसंगात माझ्या मोकळ्या स्वभावामुळे माझे अनेक वरिष्ठांपासून ते कनिष्ठांपर्यंत सर्वच क्षेत्रात आपुलकीचे नाते तयार होत गेले. हीच माझी आयुष्याची कमाई….!
