नाशिकसह पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा

राज्यातील बहुतांश भागात कालपासून अवकाळी पावसाची जोरदार हजेरी असून नाशिकसह पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी पावसासह गारपीटीचा तडाखा बसला. राज्यात बहुतांश ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण आहे. रविवारी झालेल्या पावसाने काढणीला आलेल्या पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.

नाशिक जिल्ह्यातील चांदवड, निफाड,येवला, सिन्नर या तालुक्यांना गारपीटीचा मोठा फटका बसला. पुणे शहरासह आंबेगाव परिसरात झालेल्या पावसाने काही ठिकाणी वाहतूकीचा खोळंबा झाला.

नगरमधील पारनेरमध्ये गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद, दौलताबाद, गंगापूर, लासूर स्टेशन, सिल्लोड, कन्नड, वैजापूर आणि पैठण तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.काही ठिकाणी गारपीट झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस

रविवारी रात्रीपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून पहाटे पावसाची संततधार होती. पावसामुळे वैजापूरमधील पिके जमिनदोस्त झाली आहेत.

 

नाशिकला गारपीट

नाशिक जिल्ह्यात रविवारी दुपारपासून वादळी पावसाला सुरुवात झाली. ढगांच्या गडगडाटासह वादळी गारपीटीने जिल्ह्याला झोडपले. कांद्यासह द्राक्षफळबागांचे मोठे नुकसान झाले आहे

Leave a Comment