अजितदादांच अमोल कोल्हे यांना ओपन चॅलेंज, राजकीय वर्तुळात खळबळ

अजित पवार यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांना निवडणुकीत पाडणार असल्याचं जाहीर केलं आहे. शिरूरमध्ये उमेदवार देणार आणि तो पाडणारच, असं ओपन चॅलेंज अजितदादा यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे.

अजितदादा कोल्हे यांच्या मागे का लागले? असा सवालही राजकीय वर्तुळात केला जात आहे. अजितदादा यांच्या या चॅलेंजवर खासदार अमोल कोल्हे यांनी भाष्य केलं आहे. तसेच अजितदादा यांनी संघर्ष यात्रा आणि पदयात्रांची उडवलेली खिल्ली दुर्देवी असल्याचं म्हटलं आहे.

खासदार अमोल कोल्हे यांनी टीव्ही9 मराठीला विशेष प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अजितदादा यांच्या चॅलेंजवर भाष्य केलं. मी शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करत आहे. या भागाचा चेहरामोहरा बदलण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे.

निवडणूक म्हणजे एकाने दुसऱ्याला आव्हान देण्याची गोष्ट नाही. ही प्रतिनिधीत्व करण्याची बाब आहे. प्रश्न मांडण्याची गोष्ट आहे. दादा हे मोठे नेते आहेत. त्यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर द्यायला मी मोठा नाही. मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करणार. मला पक्षाने तिकीट दिलं तर शंभर टक्के लढणार.

मी माझ्या मतदारसंघात पाच वर्षापासून काम करत आहे. मतदारसंघात विकासकामे केली आहेत. शरद पवार जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment