अहमदनगर जिल्ह्यातील पोलिसांच्या तीन दिवसांसाठी सुट्या रद्द…

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आंतरवाली सराटीमधून मुंबईकडे रवाना झाले आहे. त्यामुळे राज्यभरात देखील मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन होण्याची शक्यता लक्षात घेता, पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहे.

याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाकडून पत्र काढण्यात आले आहे. ज्यात 20 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत सर्व पोलीस अधिकारी, अमलदार यांच्या साप्ताहिक सुट्टीसह सर्व प्रकारच्या सुट्ट्या (वैद्यकीय रजा वगळून) रद्द करण्यास घटक प्रमुखांना मान्यता देण्यात आली आहे.

पोलीस महासंचालकांच्या पत्रानंतर अहमदनगर पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय सुट्ट्या वगळता इतर सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्याचा आदेश काढण्यात आला आहे.

अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘अहमदनगर जिल्हयात 21 जानेवारी ते 22 जानेवारी या काळात मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी ते मौजे कोळगाव (ता. गेवराई), मीड सांगवी, पाथडी, तीसगाव, करंजी घाट, बाराबाभळी, भिगार, जी पी ओ नौक, केडगाव, सुगा, वाडेगव्हाण, गव्हाणवाडी असा अहमदनगर जिल्ह्यातून प्रवास करुन पुणे मार्गे मुंबईतील आझाद मैदान असा मराठा आरक्षण अनुषंगाने पायी दिंडी करणार आहेत.

त्याकरीता जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडु नये या करीता कायदा व सुव्यवस्था व सुरक्षिततेच्या दृष्टीने बंदोबस्तासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी,अंमलदार यांच्या साप्ताहिक सुट्टी, सर्व प्रकारच्या रजा (वैद्यकीय रजा वगळून) 20 ते 22 जानेवारी असे एकुण 3 दिवस बंद करण्यात आले आहे. तर, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस स्टेशन व सर्व शाखा प्रभारी अधिकारी, पोलीस महासंचालक यांच्या पत्राचे अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करावी.

Leave a Comment