साकूर – बिरेवाडी रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळेना ; ठेकेदाराकडून दिरंगाई

संगमनेर तालुक्यातील साकूर ते बिरेवाडी फाटा या जिल्हा परिषद अंतर्गत १ किमी रस्त्याच्या डागडुजीसाठी काही महिन्यांपूर्वी निधी मंजूर झाला आहे. तसेच संबंधित काम एका ठेकेदाराने घेतले असून काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या साईट पट्ट्या बुजवण्यासाठी मुरूम टाकून कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर जवळपास दीड ते दोन महिने उलटून गेला तरीही ठेकेदाराने दिरंगाई करत काम अद्यापही चालू न केल्याने ग्रामस्थांसह नागरिक संतप्त झाले आहेत.

जिल्हा परिषद अंतर्गत असलेला साकूर ते बिरेवाडी फाटा हा मार्ग दळणवळणच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतू गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली असून वारंवार मागणी करूनही रस्त्याची जैसे थीच अवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच रस्त्याच्या साईट पट्ट्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळेच छोट्या – मोठ्या अपघातांची संख्या वाढली असून दळणवळण धोक्यात आले होते.

त्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत १ किमी रस्त्याच्या डागडुजीसाठी काही दिवसांपूर्वी निधी मंजूर झाला होता. या रस्त्याचे काम एका ठेकेदाराने घेऊन काम सुरू केले. तसेच काही दिवसांपूर्वी प्रथमतः मुरूमाने साईट पट्ट्या बुजवून कामाला सुरुवात केली होती. परंतु दीड ते दोन महिने उलटून गेले तरीही या ठेकेदाराने दिरंगाई करत अद्यापही काम चालू केले नाही. त्यामुळे मुरूमाने बुजविलेल्या साईट पट्ट्या देखील उखडून चालल्या आहेत. तसेच अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत आहे.

या ठेकेदाराचे कामही अत्यंत कासवगतीने चालू असून ठेकेदारच बदलण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळेच साकूर – बिरेवाडी रस्त्याची दुरवस्था झाली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ठेकेदाराला कामकाजाविषयी कुठलेही गांभिर्य नसल्याचे दिसून येत आहे. तसेच मुरूम टाकून काम सुरू केल्याचा दिखावा केला. पण प्रत्यक्षात कामाला मुहूर्त मिळाला नाही. त्यामुळे लवकरात लवकर काम चालू न केल्यास पालकमंत्र्यांकडे याविषयी निवेदन देण्यात येईल असा इशारा काही ग्रामस्थांनी दिला आहे.

Leave a Comment