ABP C Voter Opinion Poll : देशभरात लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) प्रचार शिगेला पोहचला आहे. प्रत्येक पक्षाकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या निकालाची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर एबीपी माझा-सी व्होटरचा ओपिनियन पोल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
राज्यात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीला यश मिळताना दिसत आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी 30 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील. तर 18 लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय होईल. उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण आठ जागा असून त्यात भाजपचा दबदबा राहणार असल्याचे दिसून येत आहे. यात भाजपला पाच जागा, ठाकरे गटाला एक जागा तर शरद पवार गटाला एक जागा मिळण्याची शक्यता आहे.
शिर्डीत ठाकरे गट आघाडीवर
शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिंदे गटातून सदाशिव लोखंडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर ठाकरे गटाने भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सदाशिव लोखंडे आणि भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात पुन्हा एकदा लढत होणार असल्याने या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मात्र यात ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे बाजी मारणार, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
