संगमनेर(DSNews24) सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. महाविकास आघाडीकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाऊसाहेब वाकचौरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच त्यांच्या प्रचारासाठी कॉंग्रेस पक्षाने चांगलीच कंबर कसली आहे. नुकतेच संगमनेर तालुक्यातील साकूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ नियोजनपर कॉंग्रेस पक्षाची बैठक पार पडली. दरम्यान यावेळी साकूर येथील आदम उस्मान कुरणे यांनी कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केलाय.
थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, एकविरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित खेमनर यांच्या उपस्थितीत आदम उस्मान कुरणे यांनी विरोधी गटाची साथ सोडत थेट कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे विरोधी गटाला मोठा धक्का बसलाय. कुरणे यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कामांवर प्रभावित होऊन प्रवेश केला आहे.
दरम्यान आदम उस्मान कुरणे यांनी दीड वर्षापूर्वी साकूर ग्रामपंचायत निवडणूकीत प्रभाग क्रमांक ६ मधून कॉंग्रेसच्या उमेदवारा विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीत उतरले होते. त्यावेळी त्यांचा काही मतांनी पराभव देखील झाला होता. तसेच त्यांचा दांडगा जनसंपर्क देखील आहे. त्यातच माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यावर प्रेरीत होऊन कुरणे यांनी थेट कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याने साकूरमधील विरोधी गटात खळबळ उडाली आहे. तसेच विरोधी गटाला अचानक जोरदार धक्का बसला आहे.
