अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज बाद

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी दाखल झालेल्या अर्जांची शनिवारी छाननी झाली. या छाननीमध्ये पक्षाचा एबी फॉर्म नसणे, तसेच अर्जामध्ये त्रुटी असणे यामुळे पाच अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बाद ठरविले आहेत. अर्ज बाद झालेल्यांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश आहे.

अजित पवार यांनी डमी उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांनी अर्जासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा एबी फॉर्म जोडला नव्हता. त्यामुळे पवार यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 46 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. आता उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत सोमवारपर्यंत (दि.22) असून, सोमवारी दुपारी बारामतीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

बारामती लोकसभेसाठी 51 उमेदवारांनी अर्ज भरले होते. उमेदवारांना अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी मुदत दिली होती. मात्र या मुदतीमध्ये उमेदवारांनी अर्जातील त्रुटी दूर केली नाही. तसेच आवश्यक ते कागदपत्र सादर केले नाही. त्यामुळे या पाच उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले.

बारामती लोकसभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे यांनी अर्ज भरला असून तो अर्ज पात्र ठरविण्यात आला आहे. आता उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीनंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Leave a Comment