विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला राज्य निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे.
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह कायम ठेवले आहे. तर निवडणूक आयोगाने ‘पिपाणी’ आणि ‘तुतारी’ हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणूक आयोगाच्या पत्रात काय?
जयंत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाने काढलेले पत्र वाचून दाखवले. दि. 30 नोव्हेंबर 2019 च्या अधिसूचनेतील परिशिष्ट 3 मधील अनुक्रमांक 172 वरील ‘बिगुल’ (पिपाणी) आणि अनुक्रमांक 173 वरील ‘तुतारी’ ही मुक्त चिन्ह गोठवण्यात येत आहेत, असे पत्रक राज्य निवडणूक आयोगाने काढले आहे. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत याबद्दलची माहिती दिली.
