विधानसभेपुर्वी राज्यात मोठा राजकीय भूकंप? अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार….

महायुती सरकारमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून दसऱ्या तिसऱ्या फळीतल्या नेत्यांमध्ये धुसफूस सुरू असते. मात्र ही धुसफूस आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या विधानामुळे चव्हाट्यावर आलीय.

आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडीला मांडी लावून बसलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात असं धक्कादायक विधान सावंतांनी जाहीर कार्यक्रमात केलंय. हे कमी होतं की काय, त्यानंतर काही वेळातच सावंतांची दुसरी व्हिडिओ क्लीप व्हायरल झाली.

यात त्यांनी धाराशिवच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी मतदान मागितलं नसल्याचं कबूल केलं. ‘मांडीला मांडी लावून बसतो, बाहेर उलट्या करतो’, असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं होतं.

सावंतांच्या या विधानांमुळे अजित पवार आणि सुनील तटकरेंनी थेट मुख्यमंत्री शिंदेंकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय. अजितदादांच्या पक्षानं तर सावंतांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केलीय. शिंदे गटानं मात्र सारवासारव करत सावंतांच्या विधानापासून फारकत घेतलीय. यातच अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेष पाटील यांनी म्हटले आहे की, ‘सावंतांची हकालपट्टी करा नाहीतर आम्ही बाहेर पडतो.’ तर यावरच शिंदे गटानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या वादावर बोलताना उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, ‘सावंतांचं मत व्यक्तिगत, पक्षाची भूमिका नाही’

अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतर शिंदे गटातल्या अनेक नेत्यांनी सत्तेच्या सारीपाटात तिसरा भिडू नको अशी भूमिका वारंवार घेतली होती. मात्र लोकसभा निवडणुकीतल्या यशामुळे शिंदे गटाचा आत्मविश्वास वाढला. तर अजित पवारांच्या पक्षाची चांगलीच गोची झाली. त्यामुळे अजित पवारच नाराज असल्याची चर्चा रंगू लागली. आणि त्यांनी ती वेळोवेळी कोणत्या ना कोणत्या मार्गानं व्यक्तही केली.

Leave a Comment